आज निवडणुका झाल्या तर... ठाकरेंना धक्का?
मुंबई, 19 जून : लोकसभा निवडणुकांना आता अवघे काही महिने उरले आहेत, तर विधानसभा निवडणुकींना सव्वा वर्ष बाकी आहे, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. निवडणुकींच्या तोंडावर आता वेगवेगळे सर्व्हे येऊ लागले आहेत. ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने नुकताच एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष दाखवण्यात आला आहे, तर शिवसेनेसह ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची स्थिती जैसे थेच राहिल तर काँग्रेसच्या जागा वाढतील, असा अंदाज या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे. न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेनुसार भाजपला महाराष्ट्रात 123 ते 129 जागा मिळतील. राष्ट्रवादीला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय शिवसेनेला 25 आणि ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यानंतर मागच्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत 56 पैकी 40 आमदार गेले तर ठाकरेंसोबत उरलेले आमदार शिल्लक राहिले. या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार आज निवडणुका झाल्या तर एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही धक्का बसू शकतो. एवढच नाही तर काँग्रेस स्वबळावर लढली तर त्यांना फक्त 28 जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विभागांमध्ये कुणाला किती जागा? मुख्यमंत्रिपदी फडणवीसांना पसंती या सर्व्हेनुसार मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना पसंती मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के पसंती देण्यात आली आहेत. तर अशोक चव्हाण यांना 21 टक्के, अजित पवार यांना 21 टक्के, एकनाथ शिंदे यांना 12 टक्के, उद्धव ठाकरे यांना 9 टक्के आणि इतरांना 9 टक्के पसंती देण्यात आली आहे.