JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अपघातानं सुटली कुस्ती, पण पैलवानानं 'या' क्षेत्रात मारलं मैदान, Video

अपघातानं सुटली कुस्ती, पण पैलवानानं 'या' क्षेत्रात मारलं मैदान, Video

कोल्हापूरच्या पैलवानाची कुस्ती एका अपघातानं सुटली. पण, त्यानं निराश न होता वेगळ्या क्षेत्रात मैदान मारलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 23 एप्रिल : सध्या उन्हाच्या झळा इतक्या वाढल्या आहेत की, माणसांना एखादे थंड पेये पिल्याखेरीज चैन पडत नाही आहे. कोल्हापुरात असेच एक थंड पेय मिळतेय. जे फक्त उन्हाळ्यातच नाही तर बारमाही आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरते. असे हे पेय म्हणजे थंडाई. कोल्हापुरात अशीच एक नावाजलेल्या पैलवानाने सुरू केलेली कुंड्यातली थंडाई सध्या नागरिकांना बरीच पसंतीस पडत आहे. कोण विकत आहे थंडाई? मूळचा कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील महे गावचा पैलवान असलेला अमर पाटील सध्या ही कुंड्यातली थंडाई विकत आहे. खरंतर गावावरून येऊन कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालीमीत दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीत अमर तरबेज झाला होता. महाराष्ट्र केसरीच्या वजनी गटातील विजय, मानाच्या भैरवनाथ केसरी किताबाचा मानकरी अशा यशाच्या एक एक पायऱ्या तो सर करू लागला होता. मात्र एका अपघाताने अमरचे संपूर्ण पैलवानकीचं भविष्यच संपुष्टात आले.

कसा शोधला मार्ग? पैलवानकी करत असताना खुरक आणि इतर कारणांसाठी आर्थिक आधार व्हावा, यासाठी 2017 साली अमरने रसवंती गृह सुरू केले होते. मात्र काळाची चाके फिरली आणि रसवंती गृहाच्या मशीनमध्ये बोटे अडकून अमरचा अपघात झाला. त्यामुळे नाईलाजाने त्याला कुस्ती सोडावी लागली होती. त्यानंतर एमएची डिग्री असून देखील नोकरी काही मिळत नव्हती. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. मात्र झालेल्या अपघाताने खचून न जाता पैलवानांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यदायी असणारी बदाम थंडाई ही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायला मी सुरुवात केली. त्यात देखील ही थंडाई जसे पैलवान तालमीत बनवतात, अगदी तशीच मी कुंडा आणि लाकडी घोटा वापरूनच बनवतो. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना, पर्यटकांना खऱ्या थंडाईची चव चाखायला मिळू लागली, असं पैलवान अमर पाटील सांगतो. Success Story: शेतकऱ्यानं चालवलं डोकं, कमी खर्चात करतोय लाखोंची कमाई, Video कशी बनते कुंड्यातली थंडाई? बदाम थंडाई बनवण्यासाठी बदाम, मगजबी, वेलदोडे, जायफळचा छोटा तुकडा, बडीशेप आणि इतर काही घटकांची पूड, दूध आणि साखर आदी घटक अमर पाटील वापरतो. घेतलेल्या सर्व मसाल्यांना कुंड्यात घोट्याच्या साहाय्याने व्यवस्थितरित्या घोटून घेतले जाते. बराच वेळ घोटल्यानंतर या मसाल्याचे एका सुती कापडातून वस्त्रगाळ (गाळून घेणे) केले जाते. तर यामध्ये दूध आणि साखर टाकून ही तयार झालेली थंडाई ग्राहकांना प्यायला दिली जाते. या थंडाईची किंमत 25 रुपये आहे, असंही अमर पाटील याने सांगितले. कुस्तीत नसला तरी थंडाई क्षेत्रात महाराष्ट्र केसरी सध्या अमर याच्याकडे मिळणारी थंडाई प्यायला दूर दूर वरुन आजी-माजी पैलवान येत असतात. जरी अमर त्याच्या हाताच्या दुखापतीमुळे कुस्तीत महाराष्ट्र केसरीचा मानकरी होऊ शकला नाही, तरी तो थंडाईच्या क्षेत्रात मात्र महाराष्ट्र केसरी बनला आहे, अशा भावना पैलवान रंगराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर येणारा प्रत्येक ग्राहक थंडाई पिऊन तृप्त होत अमरचे कौतुक करतच माघारी परतत असतो.

मूर्ती लहान पण… 3 फूट उंचीच्या महिलेनं सुरू केला स्वत:चा व्यवसाय, पाहा प्रेरणादायी Video

थंडाई उष्णतेवर उत्तम उपाय पैलवांन तालमीत सराव केल्यानंतर शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी थंडाई पित असतात. त्याच बरोबर थंडाईत वापरलेले घटक हे शरीराला नैसर्गिक थंडावा देतात. त्यामुळे उन्हात होणारी अंगाची लाही या थंडाईमुळे कमी होतेच. पण सर्व पौष्टिक घटकांमुळे या थंडाईचे सेवन करणाऱ्याची रोग प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास नक्कीच मदत होते. सध्या कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी थंडाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अमर याच्या कुंड्यातल्या थंडाईची चव काही औरच असल्याचे मत कोल्हापूरकर व्यक्त करत आहेत. दरम्यान ग्राहक अमरच्या चविष्ट पेयामुळे तृप्त तर होतच आहेत. मात्र त्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे जीवनात कधी हार न मानण्यासाठी आपसूकच प्रोत्साहित होत आहेत.

गूगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

कुठं मिळेल थंडाई ? पैलवान थंडाई हाऊस, नकाते कॉम्प्लेक्स, खरी कॉर्नर, मंगळवार पेठ, कोल्हापूर - 416001 संपर्क (अमर पाटील) : 9834490443

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या