वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 22 एप्रिल: महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात एक वेगळा प्रयोग केला आहे. महेश मुधोळकर यांनी मिश्र पद्धतीने फळबाग लावली आहे. तसेच फळबागेतच विविध भाजपाल्यांची शेतीही ते करतात. मिश्र फळबाग लागवडीसह भाजीपाला पीकातून मुधोळकर हे वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत. मिश्र पद्धतीने फळबाग सेवाग्राम समुद्रपूर मार्गावर मुधोळकर यांची पाच एकर शेती आहे. त्यांनी पाच एकर शेतात 5x5 फुट अंतरावर व काही 10x10 अंतरावर आंबा, चिकू, पेरू, संत्रा, मोसंबी, अॅपल बोर आदींची लागवड केली आहे. फळ पीक यायला साधारण तीन ते पाच वर्ष लागतात. या काळात शेत रिकामे राहण्यापेक्षा मुधोळकर यांनी शेतात भाजीपाला पीकाची लागवड करण्याचे ठरविले. हंगामी पालेभाज्याच्या पीकांची लागवड केली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
कमी खर्चात फायद्याची शेती मिश्र शेतीमुळे कमी खर्चात व एकाच पाण्यात फळपीक तसेच पालेभाज्याची देखरेख होत आहे. त्यामुळे शेतीची ही पद्धत त्यांना सोईस्कर ठरत आहे. पालेभाज्यांमध्ये त्यांनी गवार, पालक, लसून, कांदा, मेथी आदींसह अन्य पालेभाज्यांची लागवड केली. यातून त्यांचा खर्च वजा जाता वर्षाकाठी एक लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न होत असल्याचे मुधोळकर यांनी सांगितले. Latur News: लातूरचा रेन्चो! ठिबक सिंचनासाठी लावलं डोकं, Video पाहून म्हणाल क्या बात है पालेभाज्यांची थेट विक्री उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी शेताच्या बाहेर गारवा विक्री केंद्र सुरू केले. येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना शेतातील फ्रेश माल बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांच्या भाजीपाल्याला चांगली मागणी मिळत आहे. उत्पन्न जास्त झाल्यास वर्धा येथील भाजी बाजारात शेतमाल विक्रीसाठी नेला जातो. योग्य नियोजन केल्यामुळे शेतीतून चांगला नफा मिळतो आहे.