साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 20 एप्रिल : 2023 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे गुरुवारी (20 एप्रिल ) होत आहे. चैत्र महिन्याच्या अमावस्येला होणाऱ्या या ग्रहणाला आता काही तास शिल्लक आहेत. हे ग्रहण यंदा भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाच्या काळातील वेधादी नियम पाळावे की नाही? याबाबत अनेकांमध्ये गोंधळ आहे. कोल्हापूरचे पुरोहित कृष्णात गुरव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून त्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होणार आहे. काय आहे सूर्यग्रहणाचं वैशिष्ट्य? यंदाचं सूर्यग्रहण हे संकरित प्रकारचं आहे. हे एक दुर्मीळ प्रकारचं सूर्यग्रहण मानलं जातंय. ऑस्ट्रेलियातील किनारपट्टी निंगालू या ठिकाणाच्या अंशिक दृश्यमानतेमुळे या ग्रहणाला ‘निंगालू’ असं नाव देण्यात आलंय. 20 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल. ते दुपारी 12.29 पर्यंत म्हणजेच जवळपास 5 तास 24 मिनिटं सुरू असेल.
भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. अमेरिका, चीन, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, जपान, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण पॅसिफिक समुद्र, न्यूझीलंड आणि दक्षिण हिंद महासागर या भागातून हे ग्रहण पाहता येणार आहे. सुतक पाळावे लागणार की नाही? सामान्यतः ग्रहण म्हटलं की भारतात बऱ्याच गोष्टी केल्या जातात. 20 एप्रिलचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे सुतक पाळावे लागणार नाही, मंदिरांचे दरवाजे बंद केले जाणार नाहीत, त्याचबरोबर धार्मिक विधी, शुभ कार्य थांबवावे लागणार नाही, अशी माहिती कोल्हापूरच्या शाहू वैदिक विद्यालय येथील पुरोहित कृष्णात गुरव यांनी दिली आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण का होतात? समुद्रमंथनाशी संबंधित आहे कथा, राहू-केतूच्या उत्पत्तीचे रहस्य पुढील ग्रहण कधी? 2023 मध्ये एकूण 4 ग्रहण होणार आहेत. अद्भुत खगोलीय घटना असणाऱ्या या ग्रहणांपैकी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण होतील. यातील दोन्ही सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नाहीत. मात्र दोन्ही चंद्रग्रहण भारतातून पाहता येतील. 2023 सालचे पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असून 20 एप्रिल 2023 रोजी होत आहे. दुसरे ग्रहण म्हणजे, छाया चंद्रग्रहण 5 मे 2023 रोजी बुद्ध पौर्णिमेला होईल. तर तिसरे ग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी असेल. तर वर्षातील शेवटचे आणि चौथे ग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर 2023 रोजी असणार आहे.