साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 2 मार्च : प्रयत्न केले तर आधीपेक्षा आणखीन चांगल्या पद्धतीचे यश आपण प्राप्त करू शकतो. हेच कोल्हापूरच्या शुभमने सिद्ध करून दाखवले आहे. एमपीएससीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये कोल्हापूरच्या शुभम पाटील याने खुल्या गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्राथमिक शिक्षकाचा मुलगा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अर्थात एमपीएससी तर्फे नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान प्रमोद चौगुले यांनी पटकावले आहे. तर शुभम पाटील दुसऱ्या क्रमांकाने आणि सोनाली मात्रे तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. एमपीएससी कडून ४०५ पदांसाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतींनंतर उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार कोल्हापूरच्या शुभमने दुसरा क्रमांक पटकावला. ‘ती’ रिस्क ठरली निर्णायक, टेम्पो चालकाचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला! Video शुभम हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या साजणी गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे. गावचा तरुण इतका मोठा अधिकारी झाल्यामुळे साजणी गावात आनंदाचे वातावरण आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर साजणी येथे, तर सहावी ते दहावी नवोदय विद्यालय कागल येथे झाले आहे. अकरावी, बारावी हौसाबाई विद्यालय निमशिरगांव येथे शिक्षण झाले. दहावीत आणि बारावीत शुभम पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तर पुढे B.Sc Chemistry चे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातच राहून शुभमने स्पर्धा परीक्षेची तयारी खाजगी अभ्यासिकेतून सुरू केली. असा केला अभ्यास… ‘परीक्षेचा अभ्यास करताना इतर विद्यार्थ्यां प्रमाणेच मी देखील सकाळी ग्रंथालयात जाऊन संध्याकाळ अभ्यास करत बसायचो. या परीक्षेसाठी मी वेगळा काही अभ्यास न करता फक्त माझ्या अभ्यासात मी सातत्य राखले. अभ्यासक्रम नीट समजून घेतला. आयोगाचे मागच्या वर्षातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भर दिला. मला कधीकधी थकल्यासारखे वाटत होते, अभ्यास होत नसे, तेव्हा मी मुद्दाम प्रेरणादायी व्हिडीओ पाहून पुन्हा अभ्यासाकडं वळत असे,’ असे शुभमनं सांगितलं. कोरोनानं गाठलं, घर पुरात गेलं पण जिद्द सोडली नाही, सांगलीचा प्रमोद MPSC मध्ये पहिला! Photos पहिल्याच प्रयत्नात मिळवला होता २२ वा रँक शुभमने पहिल्याच प्रयत्नात २०२० च्या राज्यसेवा परीक्षेत २२ वा क्रमांक प्राप्त केला होता. त्यानुसार शुभम सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (प्रोबेशनरी ऑफिसर) या पदावर कार्यरत आहे. पण अजून चांगल्या यशाच्या शोधात असताना पुन्हा परीक्षा दिली. त्यानंतर 2021 मधील परीक्षेत 22 वरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. एखाद्या गोष्टीबद्दल एकदा मनाशी पक्के केले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली तर आपल्याला हवे असलेले यश आपल्याला प्राप्त होतेच. हेच शुभमने दाखवून दिले आहे.