साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 21 जून : एखाद्या दंगलीनंतरही नागरीकांना अनेक प्रकारच्या नुकसानीचा सामना करावा लागतो. अशीच परिस्थिती कोल्हापुरातील नागरिकांवरही आली होती. कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटसमुळे झालेल्या दंगलीनंतरच्या काळात तब्बल 40 तासांहून अधिक काळ इंटरनेट सेवा बंद राहील्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले होते. परिणामी या काळात कोल्हापुरातील महानगरपालिका, आयटी क्षेत्रासह अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. 1 हजार कोटींचा फटका आक्षेपार्ह स्टेटस मुळे घडलेल्या दंगलीनंतर जवळपास 40 ते 42 तास कोल्हापुरातील इंटरनेट सेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती. दंगलीनंतर कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, या इंटरनेट बंदच्या काळात तब्बल 1 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा कोल्हापूर चेंबर ऑफ कमर्सने केला आहे. इंटरनेट बंदचा कोल्हापुरातील आयटी सेक्टरला तर जवळपास १० ते १५ कोटींचा फटका बसल्याची माहिती आयटी असोसिएशन कडून देण्यात आली आहे.
या घटकांना बसला होता मोठा फटका खरंतर आजकाल सर्वच गोष्टी इंटरनेटवर आधारित आहेत. त्यामुळे या काळात आर्थिक उलाढालच थंडावली होती. तर बँकांसह, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, अनेक साध्या साध्या दुकानात जिथे UPI द्वारे पेमेंट स्वीकारले जाते, अशा ठिकाणी देखील आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत. तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे शाहू सुविधा केंद्रात दिले जाणारे दाखले हे ऑनलाईन अर्जानंतरच दिले जात असल्यामुळे तिथेही कोणतेच दाखले दिले गेले नाहीत. इंटरनेट बंद ऐवजी काही ॲप्सवरच हवी होती बंदी सोशल मीडिया वरून तेड निर्माण होऊ नये म्हणून इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र सोशल मीडियावरील काही ॲप्स वर फक्त बंदी घातली असती तरीही परिस्थिती नियंत्रणात राहिली असती. इंटरनेटच काम करत नसल्यामुळे उद्योग क्षेत्रातील जवळपास 50 ते 60 टक्के ऑनलाईन होणारी ट्रांजेक्शन्स ठप्प होती. बँकेत ग्राहकांचे चेक पास होत नव्हते, दुकानात ई बिल जनरेट होत नव्हते, तर व्यापाऱ्यांच्या जीएसटी साखळीला याचा फटका बसला होता, असे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले आहे. 2 वर्षीय चिमुकलीने अवघ्या 40 सेकंदामध्ये केला रेकॉर्ड, VIDEO पाहून कराल कौतुक आयटी क्षेत्राला सगळ्यात मोठा फटका इंटरनेटवर सगळ्यात जास्त अवलंबून असणारे क्षेत्र म्हणजे आयटी क्षेत्र होय. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कोल्हापुरातील जवळपास 15 हजार पेक्षा जास्त आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना या काळात रजा घ्यावी लागली होती. तर इंटरनेट बंद राहिल्यामुळे या काळात आयटी क्षेत्राला सगळ्यात मोठा म्हणजेच जवळपास दहा ते पंधरा कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, असे कोल्हापूर आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितले आहे. कोल्हापूर प्रशासनाचाही झाला तोटा कोल्हापुरात महानगरपालिकेचे जवळपास सर्व कामकाज हे ई गव्हर्नन्स यंत्रणेवर चालते. या यंत्रणेला इंटरनेटची आवश्यकता असते. इंटरनेट बंद मुळे महानगरपालिकेतील ऑनलाईन पेमेंट आणि सर्व कामकाज यावर मोठा परिणाम झाला होता. घरफाळा, पाणीबिल, लायसन्स आदींची दररोज अंदाजे 10 लाखांची वसुली असते. मात्र बंद असल्यामुळे हा तोटा देखील सहन करावा लागला, असे कोल्हापूर महानगरपालिकेचे सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग राजपूत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इंटरनेट बंदच्या काळात प्रशासन आणि सामान्य नागरिकांना तोटा तर सहन करावाच लागला. मात्र आपण या इंटरनेटच्या सेवेवर किती प्रमाणात अवलंबून आहोत याची जाणीवच प्रत्येकाला झाली आहे.