JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूरकरांनो, काळजी घ्या, पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर, 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी

कोल्हापूरकरांनो, काळजी घ्या, पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर, 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी

कोल्हापूरकरांना सध्या तरी पुढचे काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीसह अनेक नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर 20 जुलै : कोल्हापूरसह महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 आणि 22 जुलै रोजी येल्लो अलर्ट तर पुन्हा 23 आणि 24 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना सध्या तरी पुढचे काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीसह अनेक नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. गगबावड्यात सर्वाधिक 104.7 मिमी पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात काल 19 जुलै रोजी दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 104.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर हातकणंगले-17.2 मिमी, शिरोळ-19.1 मिमी, पन्हाळा-51.2 मिमी, शाहूवाडी-65.8 मिमी, राधानगरी-46.5 मिमी, करवीर-34.2 मिमी, कागल-23.3 मिमी, गडहिंग्लज-15.7 मिमी, भुदरगड-46.7 मिमी, आजरा-28.4 मिमी, चंदगड-48 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पंचगंगा पहिल्यांदा पात्राबाहेर सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आणि भोगावती नदीपात्रात राधानगरी धरणातून सुरू असलेल्या 1200 क्युसेक्स पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी तासातासाला वाढू लागली आहे. त्यामुळेच पंचगंगा नदी यंदा पहील्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. सध्या 20 जुलै रोजी सायंकाळी 8 वाजता राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 9 इंच इतकी होती. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 61 बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दरम्यान पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट इतकी असल्यामुळे नदी सध्या इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे अनेक ओढे, नाले, धबधबे रौद्ररूप धारण करत ओसंडून वाहत आहेत. नुकतीच रांगणा किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी जाण्यास सध्या प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामध्ये रांगणा किल्ल्यासह, बर्की धबधबा, राऊतवाडी धबधबा, नाईकवाडी धबधबा, सवतकडा धबधबा तसेच तोरस्करवाडी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना आणि स्थानिकांना बंदी घालण्यात आली आहे. तर स्वतःचा जीव धोक्यात न घालण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केली आहे.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 16 वर, आजचे बचावकार्य थांबवले

सध्या हे बंधारे आहेत पाण्याखाली : • पंचगंगा नदी - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ • भोगावती नदी - हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे • कासारी नदी - यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली • हिरण्यकेशी नदी - साळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभिळ, एनापुर • घटप्रभा नदी - पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे- सावर्डे, अडकूर • वेदगंगा नदी - निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरूपली, चिखली • कुंभी नदी - कळे, शेणवडे, वेतवडे, मांडूकली • वारणा नदी - चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी • कडवी नदी - भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे • धामणी नदी - सुळे • तुळशी नदी - बीड यासह एकूण 61 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Thane Rain : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याही ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संबंधित बातम्या

जिल्ह्यातील 76 गावांमध्ये भू-सख्खलनाचा धोका इस्त्रोकडून नुकताच एक लँडस्लाईड ॲटलास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 76 गावांना भू-सख्खलनाचा धोका आहे. यामध्ये करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, कागल, चंदगड, गगनबावडा आदी 11 तालुक्यातील तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. या गावांना स्थलांतराच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थिती पाहता आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफची 21 जवानांची एक तुकडी सर्व आवश्यक साहित्यांनिशी आधीच दाखल झालेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या