कोल्हापूर, 7 जुलै : वाढदिवस म्हटलं की शुभेच्छा द्यायला येणारे येताना सहसा हारतुरे, पुष्गुच्छ आदी गोष्टी घेऊन येत असतात. पण या गोष्टी थोड्याच कालावधी पुरत्या टिकतात. त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक पाहुण्याला नाष्टा किंवा जेवण देताना बऱ्याचदा पत्रावळ्या किंवा प्लास्टिकच्या प्लेट्सचा वापर केला जातो. यावर विचार करून कोल्हापुरातल्या एका पर्यावरणप्रेमी माजी जिल्हा परिषद सदस्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी भेटवस्तू म्हणून हारतुरे, पुष्पगुच्छ ऐवजी यावर्षी ताट-वाटी स्विकारून अनोखा उपक्रम राबवला आहे. वाढदिवसाची पंचक्रोशीत चर्चा पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या प्रकाश सर्जेराव पाटील यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाला. मात्र अजूनही त्यांच्या वाढदिवसाची चर्चा पंचक्रोशीत आहे. दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांना त्यांनी यावेळी पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन केले. तर त्या ऐवजी पर्यावरणाला हातभार लावत गावात प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी एक एक ताट आणि वाटी आणण्यास सांगितले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शुभेच्छुकांनी दिलेल्या तब्बल 1 हजारावर ताटवाट्या जमा झाल्या आहेत.
अनोख्या उपक्रमाचा गावाला होणार फायदा प्रकाश पाटील यांनी यंदा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लास्टिकच्या प्लेट्स आणि द्रोण यांचा कचरा कमी करून गावाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यातून त्यांच्या वाढदिवसा दिवशी एकूण 1237 ताट वाट्या जमा झालेल्या आहेत. या जमा झालेल्या ताटवाट्यांचा वापर यापुढे गावात होणाऱ्या भोजनावळीसाठी मोफत गावकऱ्यांना करता येणार आहे. त्यामुळे समारंभाचा खर्च तर कमी होईलच, त्याचबरोबर पर्यावरणाला देखील हातभार लागणार आहे. दरवेळी वाढदिवसाला सामाजिक उपक्रम प्रकाश पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी कासारी समूहाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण कापडी पिशव्या वाटप करून साजरा केला जात असतो. त्यामुळे त्यांच्याकडून सामाजिक कार्य नेहमीच घडत आले आहे. तर यंदाच्या अभिनव उपक्रमामुळे गावपातळीवर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास देखील आता थांबवला जाणार आहे.
3 वर्षांची अन्वी पोहोचली तब्बल 1646 मीटर उंचीवर, महाराष्ट्रातलं सर्वात उंच आहे शिखर PHOTOS
असा साजरा झाला वाढदिवस प्रकाश पाटील यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी रिंगणसोहळा आयोजित करून गावातील सर्व वारकऱ्यांसह हरीनामाचा गजर केला होता. वारकऱ्यांना शाल आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मानही केला होता. दरम्यान पर्यावरण वाचवण्यासाठीच्या नुसत्या घोषणा देण्याऐवजी कृती करून दाखवल्यामुळे प्रकाश पाटील यांचे पंचक्रोशीसह जिल्हाभरात सर्वत्र कौतुक होत आहे.