साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 16 जून : एखादी साधी मेहंदी आर्टिस्ट आपल्यासमोर फाडफाड इंग्रजी बोलू लागली, तर नक्कीच आपली देखील बोलती बंद होऊ शकते. हीच गोष्ट कोल्हापूरच्या सोनालीमुळे कित्येकांबरोबर घडली आहे. अत्यंत साधेपणाने राहणारी असून देखील तिच्या इंग्रजी प्रेमामुळे बॉलीवूडचे कित्येक सेलिब्रिटी देखील तिचे फॅन आहेत. कशी शिकली इंग्रजी? सोनाली दीपक वाघरी ही मूळची गुजरातची मात्र तिचे कुटुंब मुंबईत राहायला आहे. लग्नानंतर ती कोल्हापूरची सुनबाई झालीय. मुंबईत असताना जुहू बीचवर ठशांची मेहंदी काढण्यासाठी ती जात होती. तिथे येणाऱ्या पर्यटकांबद्दल तिला खास आकर्षण वाटत असे. त्यांचं बोलणं-चालणं हे सगळं ते निरखून बघत असे. याच निरीक्षणातून सोनाली इंग्रजीतून उत्तम प्रकारे बोलू देखील लागली.
फक्त सातवी पास असलेली सोनाली त्यातूनच टिकटॉक वर व्हिडिओज बनवू लागली. तिच्या व्हिडिओज ना पसंती देखील मिळू लागली. तर नंतर इंस्टाग्रामवरील sonali_mehndi या पेजवर देखील तिने व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. इंग्लिश डायलॉग्स आणि त्याचे डबिंग असे हे व्हिडिओज ती पोस्ट करत असे. हे करत असताना आपला साडीतील पेहराव आणि साधेपणा तिने कधीच सोडला नाही. यातीलच एक व्हिडिओ चक्क अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केला होता. त्यामुळे सोनालीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. ‘कानडा राजा पंढरीचा…’ काश्मिरी तरुणी गाते चक्क मराठी अभंग, एकदा हा पाहाच Video कष्टाला पर्याय नाही! ‘सध्या सोनाली नववधूच्या हातावरील मेहंदीच्या ऑर्डर स्वीकारते त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि इमिटेशन ज्वेलरी विकण्याचा तिचा व्यवसाय ती चालवते. या सोबतच आपल्या दोन लहान मुलांना देखील ती सांभाळत असते. प्रसिद्धी मिळाली म्हणून कष्ट कमी करावे लागतात, असे कधीच होत नाही. तुम्हाला काम हे करतच राहावं लागतं, ‘अशा भावना सोनालीने व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्धीचा फायदा नाही तर त्रासच… इंस्टाग्राम वरील व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळत गेल्यामुळे तिच्याबद्दल अनेक अफवा देखील उठत गेल्या. तिला बऱ्याच सेलिब्रिटींकडून पैसे मिळत आहेत, अशी देखील खोटी माहिती पसरली. ज्यामुळे तिला ती भाडे देऊन व्यवसाय करत असलेल्या जागेवरुन दुसरीकडे जावे लागले. जिथे तिला सध्या जास्त भाडे द्यावे लागत आहे. या प्रसिद्धीचा मला त्रास जास्त झाला, असे सोनाली सांगते. दरम्यान पहिल्यापासूनच चित्रपट सृष्टीत काहीतरी काम करण्याची इच्छा आहे, पण आपल्या साध्या राहणीमानामुळे ते कधीही शक्य होईल असं वाटत नाही, असे देखील मत सोनालीने व्यक्त केले आहे.