प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 16 जून : “कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा” सध्या वारीचे दिवस सुरू आहेत. विठ्ठलाच्या भक्तीत हरवून जाऊन हे शब्द ओठी घेऊन वारकरी पंढरीला निंघाले आहेत. पण कल्पना करा हेच गीत एखादी काश्मिरी मुस्लिम तरुणी गात आहे. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरंय. शमिमा अख्तर असे या काश्मिरी मुस्लिम तरुणीचं नाव आहे. सध्या त्या पुण्यामध्ये स्थायिक झाल्या आहेत. संगीत हे सर्व धर्म, प्रांत, भाषा यांना ओलांडून थेट माणसाच्या हृदयाला भिडतं, असं म्हणतात. शमिमा अख्तर यांना महाराष्ट्रातील मराठी मातीतले संतांचे अभंग भावले आणि त्यांनी ते गाण्याचा ध्यासच घेतला.
काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यातली अरागम हे शमिमा यांचं मुळ गाव. त्यांचं त्यांचे शालेय शिक्षण काश्मीरमध्येच झाले. संगीताचे संस्कार आणि वातावरण त्यांना घरातच मिळाले. संगीताची उपजतच आवड असल्यामुळे त्यांनी त्यातच पुढे करिअर करायचे ठरवलं. लखनऊ येथे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेऊन त्यांनी ‘संगीत विशारद’ ही डिग्री मिळवली. सरहद संस्थेच्या माध्यमातून 2018 साली त्या पुण्यात आल्या. सर्वप्रथम काय गायलं? पुण्यात त्यांनी सर्वप्रथम पसायदान ऐकलं तेव्हा त्यांना त्यामध्ये दिव्य सकारात्मक ऊर्जा असल्याचं जाणवलं. ते त्यांना खूप भावलं. त्यांनी ते सरहद संस्थेच्या माध्यमातून गायलं. त्यांच्या पसायदानाला पुणेकरांनी जोरदार दाद दिली. काश्मीरी नागरिकांनीही त्यांचं कौतुक केलं. त्यांनी ‘माझे माहेर पंढरी’, ‘कानडा राजा पंढरीचा’ असे अनेक अभंग गायले. सरहद म्युझिक युट्यूब चॅनेलवरून हे अभंग प्रदर्शित झाले आहेत. या गाण्यांना आजवर काश्मीरमध्ये तसंच पाकिस्तानमध्येही चांगला प्रतिसाद मिळालाय, असं शमिमा यांनी सांगितलं. वारीत मुस्लिम रिक्षाचालकांकडून मोफत सेवा, वारकरी भारावले Video कसे शिकले अभंग? शमिमा यांनी मराठी अभंग किंवा गीत ऐकल्यानंतर सगळ्यात आधी ते उर्दू किंवा इंग्लिशमध्ये लिहून काढले. त्यानंतर ते आत्मसात होईपर्यंत अनेक दिवस रियाझ केला. मग त्यांनी अगदी हुबेहूब मराठी बाजामध्ये गायला सुरुवात केली. मराठीसोबतच कन्नडमधूनही त्यांनी अभंग गायले आहेत. संतांच्या रचना या धर्म आणि जात यांच्या पलीकडे जाऊन मनाला शांती देतात, असं शमिमा म्हणतात. “आपल्या देशात सर्व धर्माचे लोक मिळून सण-उत्सव साजरे करतात. ही खूप सुंदर गोष्ट आहे. कला वेगवेगळ्या संस्कृतींना एकत्र आणते. पसायदान गाताना खूप छान वाटतं. एक प्रसन्न शांतता मिळते. मराठी भाषेमध्ये एक वेगळीच गोडी आहे. मराठी अभंग गातागाता हळूहळू मी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे.” असे शमिमा यांनी यावेळी सांगितलं.