साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 24 फेब्रुवारी : फास्ट फुडच्या जमान्यातही तरुण वर्गात पारंपारिक नाष्ट्याची लोकप्रियता कायम आहे. पारंपारिक नाष्ट्याच्या पदार्थांमध्ये थालीपीठचा समावेश होतो. तुम्ही घरी पारंपारिक पद्धतीनं बनलेलं थालीपीठ खाल्लं असेल. पण कधी हुरड्याचं थालीपीठ खाल्लं आहे का? कोल्हापुरातील एका प्रदर्शनात याचा स्टॉल लावण्यात आला होता. खवय्या कोल्हापूरकरांनी या पदार्थाच चांगलंच कौतुक केलं आहे. हुरड्याचं थालीपीठ कसं बनवलं जातं हे पाहूया. इंदापूरच्या पुष्पा निंबाळकर या आपल्या महिला बचत गटासोबत कोल्हापुरात एका प्रदर्शनासाठी आल्या होत्या. वेगवेगळ्या प्रदर्शनात त्याचबरोबर छोट्या स्तरावर त्या त्यांचा थालीपीठाचा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या थालीपीठाचे वैशिष्ट्य म्हणजे भीमथडीच्या जत्रेमध्येच त्यांच्या थालीपीठाला एक वेगळी ओळख मिळू लागली. त्यामुळे त्यांच्या हुरड्याच्या थालीपीठाला भीमथडी स्पेशल थालीपीठ म्हणून देखील ओळखले जाते.
काशी सुचली संकल्पना ? थंडीच्या दिवसात हुरडा खाण्याची सोलापूरच्या पट्ट्यात प्रथा आहे. आता या हुरड्याला महाराष्ट्रभर मागणी आहे. आम्ही ज्वारीचा हुरडा खात होतो भाजून हुरडा खाताना तो चविष्ठ लागतो. थालीपीठात विविध डाळी आणि त्यांच्या सोबतच हा हुरडा मिक्स करून खाताना त्याची चव आम्हाला आवडायला लागली आणि त्यातूनच आम्हाला या हुरड्याच्या थालीपीठाची संकल्पना सुचली, असे निंबाळकर यांनी सांगितले.
कसे होते तयार?
या थालीपीठात ज्वारी हुरडा वापरताना तो वाळवून मग भाजून आणि त्यानंतर बारीक करून एकत्र पिठात घातला जातो. हुरडा हा चवीला थोडाफार गोड असतो. त्यामुळे डाळींच्या पिठांच्या मिश्रणानंतर आणि या हुरड्यामुळे या थालीपीठाला एक वेगळी चव मिळते. हूरड्याचे थालीपीठ बनवताना वेगवेगळ्या डाळी वाळवून भाजून घेतलेल्या हुरड्याचे पीठ एकत्र केले जाते. Chicken Vada Pav : मित्राचा ऐकला सल्ला आणि कोल्हापूरकरांना मिळाला ‘लय भारी’ पदार्थ, Video ज्वारीच्या हूरड्याच्या पिठा बरोबरच यामध्ये गहू, तांदूळ, बाजरी, उडीद डाळ, हरभरा डाळ, मुगडाळ आदींचे एकत्र पिठ आणि ओवा, धने, जिरे आदी घटक एकत्र केले जातात. हे कोरडे पिठ तयार करून ठेवले जाते. ज्यावेळी थालीपीठ बनवायचे असते, तेव्हा त्यामध्ये हळद, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, काकडी, दुधी आदी घटक घातले जातात. या सगळ्यांमुळे या थालीपीठाला खूप छान चव येते, असेही निंबाळकर सांगतात.