कोल्हापूर, 28 जानेवारी : सध्या रस्त्यालगत आपल्याला अनेक बॉम्बे वडापावचे स्टॉल्स बघायला मिळत असतात. स्वस्तात मस्त असा हा नाश्ता असल्याने अशा ठिकाणी गर्दी देखील भरपूर होत असते. पण एक नवा प्रकारचा वडापाव कोल्हापुरात सध्या मिळू लागला आहे. तो म्हणजे चिकन वडापाव. चिकन आणि वडापावचे हे अनोखे कॉम्बिनेशन लोकांना पसंतीस देखील पडू लागले आहे. कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरात राहणारे मयूर भोसले हे त्यांच्या स्टॉलवर चिकन वडापाव विकत आहेत. हा चिकन वडापाव विकायला सुरुवात करण्याआधी त्यांनी आठवडाभर याची ट्रायल घेतली होती. त्यानंतर आता खवय्यांसाठी कोल्हापुरात पहिल्यांदाच असा हा नवीन प्रकारचा चिकन वडापाव ते विकत आहेत. आतमध्ये बटाट्याचे मिश्रण आणि वर बेसन पीठाचे आवरण असा बटाटे वडापाव खायची आपल्याला सवय झाली आहे. मात्र, चवीला एखाद्या नॉनव्हेज बर्गर प्रमाणे लागणारा हा चिकन वडापावही आता लोक आवडीने खात आहेत.
कशी झाली सुरुवात? मयूर यांचा चिकन 65 आणि चिकन खिमा रोलचा गाडा होता. चिकन खिमा रोल विकत असताना रोलमध्ये वापरले जाणारे चिकनचे स्टफिंग आपण जर वडापाव सोबत वापरले, तर एक नवीन पदार्थ बनवता येईल, असा विचार त्यांच्या मनात आला होता. त्याचबरोबर त्यांच्या मित्र परिवाराकडून देखील अशा प्रकारचा सल्ला त्यांना मिळाला होता. म्हणूनच त्यांनी ही नवी संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, अशी माहिती मयूर यांनी दिली आहे. सध्या त्यांच्या गाड्यावर चिकन वडापाव आणि चिकन 65 हे दोन पदार्थ मिळतात. संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत हा त्यांचा गाडा सुरू असतो. 7 नंतर या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. मयूर यांच्या परिवारातील आत्या, चुलत भाऊ असे सदस्य देखील या गाड्यावर एकत्र काम करत असतात. विशेष म्हणजे हे सर्वजण स्वतःची खाजगी नोकरी सांभाळत संध्याकाळी मयूर यांना मदत करण्यासाठी येत असतात.
Video: तात्या विंचू, कुबड्या खविस… मराठी व्हिलनला खायला ‘इथं’ होते गर्दी, पाहा काय आहे प्रकार
कसा बनवला जातो चिकन वडापाव ? ज्याप्रमाणे बटाटे वडा बनवण्यासाठी बेसन पिठाचे मिश्रण बनवले जाते. हे मिश्रण बनवताना बेसनपीठ, तिखट, मीठ आणि ओवा हे जिन्नस वापरले जातात. तर वड्याच्या आतमध्ये भरले जाणारे स्टफिंग हे बोनलेस चिकनपासून त्याचा खिमा करून बनवण्यात आलेले असते. हे स्टफिंग बनवताना मयूर हे बोनलेस चिकन आणि त्यांचे सीक्रेट मसाले वापरतात. तर ग्राहकांना खायला देताना पावाला घरगुती पुदिना चटणी, शेजवान चटणी आणि मेयोनिज सॉस लावून मध्ये हा वडा ठेवून दिला जातो. किती रुपये आहे किंमत ? साधारण बॉम्बे वडापाव हा 10 ते 15 रुपयांना सर्वत्र मिळत असतो. पण या वड्यामध्ये चिकन वापरण्यात आल्यामुळे या वड्याची किंमत 20 रुपये ठेवण्यात आल्याचे मयूर यांनी सांगितले.
पत्ता : एमबी चिकन, महावीर कॉलेज चौक, कोल्हापूर संपर्क (मयूर भोसले) : +918793209999

)







