JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेणाच्या पाट्या उचलून आईनं शिकवलं, बहिण-भावांनी पोलीस होऊन फेडले माऊलीचे पांग! पाहा Video

शेणाच्या पाट्या उचलून आईनं शिकवलं, बहिण-भावांनी पोलीस होऊन फेडले माऊलीचे पांग! पाहा Video

जालन्यातील महिलेनं शेणाच्या पाट्या उचलून मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. आज त्यांची दोन्ही मुलं पोलीस सेवेत भरती झाली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 11 एप्रिल : मुलगा दोन वर्षाचा तर मुलगी फक्त 6 महिन्याची असताना पतीनं अपघाती निधन झालं. या मोठ्या संकटानंतरही न डगमगता त्या माऊलीनं सर्व कुटुंबाचा भार पेलला. दोन्ही मुलांना शिक्षणासाठी बळ दिलं. आज त्यांच्या कष्टाचं चीज झालंय. त्यांची दोन्ही मुलं पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. जालना जिल्ह्यातल्या बहिण-भावांनी मिळवलेलं हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारं आहे. कसा झाला प्रवास? जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील सामान्य कुटुंबातील सख्या बहीण-भावाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. या भावंडांची पुणे शहर पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवड झालीय. निर्मला गवळी आणि ज्ञानेश्वर गवळी अशी या भावंडांची नावं असून त्यांनी घरामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना हे यश मिळवलंय.

निर्मला आणि ज्ञानेश्वर यांनी गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. कुटुंबात शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्यामुळे कोणाचे मार्गदर्शन मिळाले नाही. वडिलांची छत्रछाया हरवलेली असताना कुटुंबाची सर्व जबाबदारी आईने स्वीकारली. मुलांना पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठविले, तेव्हाच या दोघा बहीण-भावाने पोलिस दलात जाऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचा निश्चय केला. ‘विहिरीवर काम करीत असताना वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा मी दोन वर्षांचा होतो तर माझी बहीण निर्मला ही काही महिन्यांची होती. वडील गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आईवर येऊन पडली. प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. राहण्याची व खाण्याची सोय व्हावी म्हणून वसतिगृहात राहिलो. शिक्षण सुरु असतानाच पोलिस भरतीची तयारी केली,’ असं ज्ञानेश्वर गवळी याने सांगितलं. MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वन अधिकारी! Video आईनं उचलल्या शेणाच्या पाट्या दोन्ही मुलं लहान असतानाच त्यांचे वडील गेले.  त्यांना बापाची माया मिळाली नाही. पण, त्यांना अन्य बाबतीत मी कमी पडू दिलं नाही. शेणाच्या पाट्या उचलून, वीट भट्टीवर काम करून यांना शिकवलं. आज दोन्ही मुलं पोलिस झाल्यानं खूप छान वाटतंय. मी केलेल्या कष्टाचं मुलांनी चीज केल्यानं पोरांचा अभिमान आहे,’ असं कडूबाई गवळी यांनी सांगितलं. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी बनण्याचा मनोदय या भावंडांनी व्यक्त केला. एकाच कुटुंबातील दोघे बहीण भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने ही गोष्ट इतर युवकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी आहे. माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे या भावंडांनी सिद्ध करून दाखवले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या