सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं
मुंबई, 27 मार्च : लोकसभा खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीका करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून रविवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून राहुल गांधींवर घणाघाती टीका केली. सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही, असं थेट विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. राहुल गांधींचं विधान आणि उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोघांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. काय म्हणाले मुख्यमंत्री? ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातोय. राहुल गांधी यांनी एक दिवस अंदमान निकोबारच्या जेलमध्ये राहून दाखवावं. राहुल गांधी यांचा निषेध सर्वांनी करायला हवा. तुम्ही म्हणता मी गांधी आहे, सावरकर नाही. तुमची लायकी सुद्धा नाही, सावरकर होण्याची,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ‘आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन केली जाते, याचा मी निषेध करतो. उद्धव ठाकरे म्हणाले अपमान सहन करणार नाही, मग काय करणार आहात? तुमच्या कृतीतून ते दिसायला हवं. हे उद्धव ठाकरे यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. नुसतं बोलून नाही, कृतीतून दाखवा. बाळासाहेबांनी दाखवली तशी हिंमत दाखवणार का?’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाही डिवचलं आहे. याचसोबत राज्यात सावरकर गौरव यात्रा सुरू करणार, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते राहुल गांधी? मानहानीच्या प्रकरणात खासदारकी रद्द केल्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना लंडनमध्ये दिलेल्या भाषणाबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी चांगलेच संतापलेले दिसले. भाजप नेते तुम्हाला संसदेत माफी मागायला सांगत होते, मग तुम्ही माफी का मागितली नाही, असा सवाल राहुल गांधींना करण्यात आला. तुम्ही याबद्दल काय विचार करता? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी उत्तर दिले की, ‘माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत.