प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 17 जून : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. एवढच नाही तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलंही अर्पण केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला लक्ष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी मजारीचे दर्शन घेतल्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. हे त्यांच्या विचाराचा दर्शन : भाजप प्रकाश आंबेडकर यांनी क्रूर राजाचे दर्शन घेतलं हे त्यांच्या विचारांचं दर्शन आहे. कुणाचे दर्शन घेणे किंवा कुणाची पूजा करावी हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण त्यांच्यापेक्षा जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला विचारावा वाटतं की “कबरीचा दर्जा काढून घ्या असं दानवे बोलले होते. आपण कुणाबरोबर बसतो? कुणाच्या विचारांसमोर चाललोय ह्याचा एकदा विचार करावा. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या विचाराचे दर्शन घडू लागले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या हिंदुत्वासाठी रक्त महाराष्ट्रात ओतलं, हिंदुत्वाचे स्वप्न पाहिलं होतं. ते सर्व धुळीत मिळवण्याचं काम यांच्याबरोबर राहून सुरू आहे. हे दर्शन उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुस्लिम राज्यकर्त्यांबद्दल काय मत होतं ते एकदा वाचावं”, असाही सल्ला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी दिला आहे. वाचा - जयंत पाटील मुलासाठी आशावादी, लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकासआघाडीत नवा पेच? काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? ‘भारताच्या दृष्टीकोनातून खुलताबाद हे ऐतिहासिक शहर आहे, त्याचा लोकांनी विचार करावा. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे, त्यांना एवढच सांगतो औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं, ते कुणाला मिटवता येणार नाही’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ‘औरंगजेबाचं राज्य आलं ते जयचंदमुळे आलं हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. असे जयचंद बऱ्याच हिंदू राजांमध्ये होते, त्यांना तुम्ही शिव्या का घालत नाही? ही ताकद दाखवा ना. ज्यांनी या देशाला गुलाम केलं त्यांची निंदा करा, असेल ताकद तर करून दाखवा’, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.