ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 17 जून : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरात सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून सगळेच पक्ष दावा करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेसुद्धा स्वतःसाठी आणि मुलगा प्रतीकसाठी हातकणंगले मतदार संघातून चाचपणी करत आहे. त्यामुळे जागावाटपावरून चांगलाच पेच निर्माण होणार आहे तर तिकडे खासदार संजय मंडलिक येणारी निवडणूक भारतीय जनता पार्टीकडून लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरात राजकीय चर्चांना उधाण आलय. लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी असले तरी सर्वच पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षाकडून दोन्ही मतदार संघावर दावे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभा मतदार संघही कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात येतो. त्यामुळे त्यांनीही आपली तयारी या ठिकाणी सुरू केलीय. ते स्वतः किंवा त्यांचा मुलगा प्रतीक या मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार असू शकतो. मात्र, काँग्रेसनेही या मतदार संघावर आपला दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. संजय मंडलिक भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता एका बाजूला महाविकास आघाडीचा जागांबाबतचा पेच सुटत नसताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे भाजपमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात रंगली आहे. संजय मंडलिक 2019 ला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले असले तरी काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत मंडलिक यांचा विजय सुकर केला होता. मात्र, आता अवघ्या 4 वर्षातच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून खासदार संजय मंडलिक हे भाजपकडूनच निवडणूक लढवणार असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील या वृत्ताला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय. वाचा - Nagpur News: ‘मी विहिरीत उडी मारेन पण…’, काँग्रेस नेत्याच्या ऑफरवर असं का म्हणाले होते नितीन गडकरी? स्वतः सांगितला किस्सा हातकणंगले मतदार संघाचा पेच महाविकास आघाडीत असला तरी कोल्हापूरच्या जागेबाबत मात्र तिन्ही पक्ष एकत्र येऊन भाजप सेनेच्या विरोधात मोट बांधताना दिसत आहेत. गेल्या वेळी या मतदार संघात शिवसेनेच्या खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सतेज पाटील यांनी देखील आमचं ठरलंय हा इतिहास झाला. आता त्यावर बोलून उपयोग नाही भविष्याकडे पाहिलं पाहिजे असं म्हणत संजय मंडलिक यांच्यासाठी महाविकास आघाडीची दारं जवळपास बंद केली आहे. एकूणच महाराष्ट्रतल्या सत्तांतरांतर राजकारण चांगलंच बदलल्याचे पाहायला मिळत आहे.जागांबाबतचे दावे आणि उमेदवरांचा शोध असे अनेक अडथळे सर्वच पक्षांना पार पडावे लागणार आहेत. त्यामुळे विद्यमान खासदारांना उमेदवारीची संधी मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे तर महाविकास आघाडीला जागेवरच्या दाव्याबाबत झगडावे लागणार आहे. यात आता कोण बाजी मारणार आणि कोण उमेदवार असणार याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.