पाण्यात वाढदिवस
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा, 19 जुलै : राज्यातील मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. सोमवारपासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार पाण्यात गेलेत. तर काही उघड्यावर आलेत. अशात एका पठ्ठ्याने गडघ्यापेक्षा जास्त पाण्यात आपला वाढविवस मित्रांसोबत साजरा केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील आहे. गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यात वाढदिवस बुलढाणा जिल्ह्यात घरात पावसाचे पाणी शिरले म्हणून एका पठ्ठ्याने चक्क गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यात मित्रांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. मलकापूर शहरात या पावसाच्या पाण्याने अनेक घर गाठली, अनेक घरात हे पावसाचे पाणी शिरले, यावेळी विकास नगरात देखील अशीच परिस्थिती असताना एका पठ्ठ्याने भर पावसात आपला वाढदिवस साजरा केला आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हवामान विभागाकडून बुधवारी (ता. 19) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. यामुळे खरिपात रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असून उगवून आलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळणार आहे. वाचा - मुंबई, ठाणे कोकणातल्या शाळांना उद्या सुट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा कोकणातील ठाणे, रत्नागिरी, सिंदुधुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागांत दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडला. तर पालघर, रायगड जिल्ह्यांतील सर्वदूर जोरदात ते मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी (ता. 18) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगडमधील माणगाव येथे सर्वाधिक 250, तर पेण येथे 221.3 मिलिमीटर पाऊस पडला. खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला.