मुंबई, 19 जुलै : महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, तसंच पुढच्या 24 तासांमध्येही पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, त्यामुळे उद्या मुंबईसह, ठाणे, कोकण विभागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुंबईसह कोकणामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे. कोकणातल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याचा इशारा बघता राज्य सरकारने मुंबई आणि कोकणातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यातील इतर भागांमध्ये स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
‘सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत, कर्नाटक तेलंगणा तसंच इतर शेजारच्या राज्यांशी समन्वय साधण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, जेणेकरून धरणाचं पाणी सोडल्यानंतर कोणत्याही भागात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशाप्रकारचा समन्वय करायला सांगितला आहे, तसंच गरजेनुसार निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.