भगतसिंह कोश्यारी
मुंबई, 12 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. भगतसिंह कोश्यारी हे कायमच वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत राहिले. याच वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. जाणून घेऊयात भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले पाच वादग्रस्त व्यक्तव्य ज्यामुळे ते चर्चेत राहिले. नोव्हेंबर 2022 मध्ये भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आयकॉन असल्याचं म्हटलं होतं. आजच्या काळातील आयकॉन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले. भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा राज्यभरात निषेध करण्यात आला होता. कोश्यारी यांनी जुलै 2022 मध्ये देखील असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जर राजस्थानी आणि गुजरातील लोकांना महाराष्ट्रातून विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून बाहेर काढले तर मुंबईत पैसा राहणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता. मार्च 2022 मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे ते चांगलेच चर्चेमध्ये आले. हेही वाचा : Ramesh Bais : रमेश बैस यांनी घेतली भगतसिंह कोश्यारींची जागा; कोण आहेत राज्याचे नवे राज्यपाल? महाविकास आघाडीकडून देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये राज्यपाल कोट्यातून भरण्यात येणाऱ्या विधान परिषदेच्या बारा जागा भरण्यास त्यांनी विलंब केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.
2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. मात्र यात कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्यानं सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. अशातच 23 नोव्हेंबर 2019 ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. मात्र हे सरकार अल्पमुदतीचे ठरले यामुळे देखील कोश्यारी हे चर्चेत आले होते.