प्रातिनिधिक छायाचित्र
बीड, 15 जून, सुरेश जाधव : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुकादमानं ऊसतोडणीच्या पैशांसाठी ऊसतोड मजुरांच्या सहा चिमुकल्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस आणि बालकल्याण समितीच्या मदतीनं या चिमुकल्यांची सुटका करण्यात आली. मुलांची सुटका होताच ऊसतोड मजुरांच्या आश्रूंचा बांध फुटला. पैसे फेडूनही तो आमच्या मुलांना सोडायला तयार नव्हता. तो त्यांच्याकडून कम करून घेत असे, त्यांना जेवायला पण देत नव्हता, मारहाण करत होता असा आरोप ऊसतोड कामगारांकडून करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ऊसतोडीच्या उचलीचे पैसे बाकी राहिल्याचा दावा करत, चक्क ऊसतोड कामगाराच्या 6 चिमुकल्या मुलांनाच ऊसतोड मुकादमाने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या कुंभेज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. करमाळा पोलीस आणि बालकल्याण समितीच्या मदतीने बीड जिल्ह्यातील या सहा चिमुकल्या मुलांची सुटका करण्यात आलीये. बीडमध्ये आणल्यानंतर त्या सहा मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांनी कुटुंबीयांकडे सुपुर्द केले आहे. बीडच्या केज तालुक्यातील शिंदी गावातील एक ऊसतोड मजूर कुटुंब व गेवराई तालुक्यातील दोन कुटुंबे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर करमाळा येथील एका ऊसतोड मुकादमाने, मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचे म्हणत आणखी तीन महिने काम करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी तीन महिने काम केले. मात्र अद्यापही पैसे शिल्लक असल्याचा दावा मुकादमाने केला. पैसे द्या; अन्यथा तुमची मुले आमच्याकडे ठेवा, असे सांगत त्या ऊसतोड मुकादमाने 3 मुले व 3 मुली करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे डांबून ठेवल्या.
भीषण अग्नितांडव! झोपेतच घराला लागली आग; बापाच्या डोळ्यादेखत 5 मुलं आणि पत्नीचा जळून मृत्यूया दरम्यान शांताबाई वसंत माळी यांनी सोलापूर येथील चाइल्ड लाइनला मुले डांबून ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून चाइल्ड लाइनने ही माहिती सोलापूरच्या बाल कल्याण समितीला कळवली. समितीने करमाळा पोलिसांना याची माहिती देत त्या बालकांची सुटका करण्यास सांगितले . पोलिसांनी या चिमुकल्या बालकांची सुटका करून सोलापूर बालकल्याण समितीपुढे सादर केले. तेथून केजच्या अमर पाटील यांनी त्या मुलांना बालकल्याण समितीच्या मदतीने बीडमध्ये आणले. त्यानंतर बालकल्याण समितीने त्या 6 चिमुकल्यांना आई- वडिलांकडे सुपुर्द केले. यावेळी घडलेली आपबिती सांगतांना ऊसतोड मजुराला अश्रू अनावर झाले. " तो सांगत होता, की आम्ही ऊसतोडीसाठी उचल घेतली. मात्र 6 महिने ऊसतोडणी करून ती आम्ही फेडली. तरी देखील आमच्याकडे पैसे बाकी आहेत. अस मुकादम म्हणायचा, म्हणून त्याने आम्हाला त्या ठिकाणी जबरदस्तीनं ठेवलं. आम्ही 3 महिने पुन्हा काम केलं. मात्र तरी आमच्याकडे पैसे बाकी आहेत असं तो म्हणाला. मग त्याने आमच्या मुलांना त्याच्याकडे ठेवलं. मुकादमानं आम्हाला मारहाणही केली असं आरोप या कुटुंबांकडून करण्यात आला आहे.