मृत विद्यार्थी
औरंगाबाद, 15 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल व्हॅलेंटाईन डे होता. या “व्हॅलेंटाईन डे"च्या दिवशीच देवगिरी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. देवगिरी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने आणि एका विद्यार्थ्याने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सिडको परिसरात राहणारी तेजस्विनी अवकाळे ही तरुणी विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. तसेच ती राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडू देखील आहे. तेजस्विनीने 12 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले होते. यानंतर तिची रात्री प्राणज्योत मावळली. तर त्याच विद्यालयात गारखेडा परिसरातील व्यंकटेश चव्हाण हा विज्ञान शाखेत प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याने काल आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सिडको आणि पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने औरंगाबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा - Valentine’s Day : प्रेमात धोका..या 5 घटनांनी हादरला महाराष्ट्र
न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलाचा मृत्यू -
काल (14 फेब्रुवारी) सर्वत्र व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात आला. यातच एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आपल्या कुटुंबाला न सांगता गोव्याला गेलेल्या एका प्रेमी युगुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोव्यातील पाओलिम बीच परिसरामध्ये ही घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रिया दुबे (वय 26) आणि विभू शर्मा (वय 27), अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. सुप्रिया आणि विभू हे एकमेकांचे नातेवाईक असून, ते गोव्यात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघे गेल्या काही दिवसांपासून गोव्यात होते. एकत्र सुट्टी घालवण्यासाठी ते गोव्यात आले होते.
स्थानिकांनी सोमवारी रात्री दोघांना पाओलिम बीचजवळ फिरताना पाहिलं होतं. कोकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया आणि विभू हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. सुप्रिया कामानिमित्त बेंगळुरूमध्ये राहत होती तर विभू दिल्लीमध्ये राहत होता. व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी ते गोव्याला आले होते, असा अंदाज आहे. दोघांचा मृत्यू नेमक्या कशा परिस्थितीमध्ये झाला, हे अद्याप उघड झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.