जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई, 5 जून : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पक्षात उभी फूट पडून शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आज मुंबईत मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या मेळाव्यांतून दोन्ही गटातील नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन घरी बसावं आणि आशीर्वाद द्यावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. तर आमची विठ्ठलावर भक्ती असून बडव्यांमुळे बाहेर पडल्याचं भुजबळांनी सांगितलं. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडलं. या आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार उत्तर देत पलटवार केला आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? अजित पवार म्हणाले, ठाण्यातील तो पठ्ठा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे असे पक्ष सोडून गेले. अजित पवारांच्या आरोपांवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्यामुळे पक्षाचे नेते पक्ष सोडून गेले, असं त्यांना तसं वाटत असेल. तर ठीक आहे. अजित पवारांबद्दल माझी काहीही तक्रार नाही. माझी तक्रार फक्त एकच आहे. शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी आणि घरी बसावं, ही जी भावना तुम्ही व्यक्त करताय, त्याविरोधात मी उभा आहे.” “तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं आहे, ते तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे. पण जो कर्तृत्ववान मुलगा असतो, तो आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी सांगतो, तुम्ही काम करत राहा. पण तुम्ही (अजित पवार) तर सगळे मिळून त्यांना निरोपच देत आहात. घरी बसायला सांगत आहात. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, ते घरी बसणार नाहीत.” वाचा - शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजितदादांनी टाकला डाव, शरद पवारांचं अध्यक्षपदच धोक्यात? ग्रामीण भागातील शरद पवारांचं स्थान कमी करायचंय : आव्हाड काकांना गिळून टाकायला निघालेत. आपल्यासाठी कुणी काय केले आणि तुम्ही काय करताय? पवारांनी वटवृक्ष निर्माण केला, त्या वृक्षावरील घरट्यातून त्यांना काढून टाकायला निघालात. शरद पवारांवर कशाप्रकारे दबाव टाकला जात होता, ते सर्वांना माहिती आहे. जितेंद्र आव्हाडकडे कारखाने नाहीत, बँका नाहीत, पैसा नाहीय एवढे सगळे करून तो बोलायचे थांबत नाही. कोणावर तरी नारळ फोडायचा असतो, तसा माझ्यावर फोडला, अशी टीका आव्हाड यांनी केली.
राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या संघटनांची, विभागांची सोशल मीडियावर पेजेस आहेत. त्यांना धमक्या दिल्या जातायत. त्या पेजेसचा ताबा आमच्याकडे द्या, त्या पोरांनी माझ्याकडे लिखीत तक्रार दिली आहे. आजच्या भाषणातून शरद पवारांना हाकलायचेच होते हे समोर आले. वय असते तर ठीक ज्या माणसाचे आता वय नाही त्याला हाकलण्यासाठी एवढा आटापिटा. काही लोकांनी शरद पवारांना सांगितले की जितेंद्रही आमच्यासोबत आहे. त्यांनी मला फोन केला अन् विचारले तेव्हा मी त्यांना म्हणालो, साहेब त्यांच्यासमोर नाही कसे म्हणणार, तेव्हा पवार हसले होते, असा किस्सा आव्हाडांनी सांगितला. शरद पवारांचा लोकांशी संपर्क तोडायचा होता. लोकांना त्यांच्याशी तोडायचे होते. यासाठी हे रचलेले षडयंत्र आहे. आज तुम्ही शरद पवार घरी बसा अशी घोषणा द्यायला हवी होती, असा टोला आव्हाड यांनी लगावला.