संगमनेर/अहमदनगर, 12 फेब्रुवारी : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे ठेवण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे बिरोबा यात्रेनिमीत्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गौतमीची लावणी सुरू होताच अनेक तरूणांनी बँरेकेटस हटवत आत घुसण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक बाऊंसर एक डझन महिला बाऊंसर तसेच तीस ते चाळीस पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गर्दीवर नियंत्रण मिळवताना बाउंसरसह पोलिसांची मोठी दमछाक झाली होती.
हे ही वाचा : कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यानं विरोधक आक्रमक; राष्ट्रवादीने फडणवीसांना करून दिली त्यांच्याच शब्दांची आठवण
गौतमी पाटीलच्या डान्सवरून पुण्यातही राडा
जिच्या डान्सनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे अशा गौतमी पाटीलच्या नियोजित कार्यक्रमाची परवानगी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे. 10 फेब्रुवारीला गौतमीचा पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी ऐन वेळी पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पुण्यातील शिवणे येथे गौतमीचा कार्यक्रम होता.
शिवणे येथील धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटीलच्या हस्ते होणार होते. परंतू ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता तिथल्या जागेची NOC आणि ट्रॅफिक NOC नसल्याने पोलिसांकडून परवानगी नाकारली. गौतमी पाटीलची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात वाढली आहे. महाराष्ट्रात गौतमीचा कार्यक्रम कोणत्याही जिल्ह्यात असो कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी होत असते. गौतमीच्या पुण्यातील कार्यक्रमातही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती.
काही दिवसांआधीच राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रात अनेक पक्षाचे लोक गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करतात मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडल्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले.
हे ही वाचा : …तर फक्त तंबाखू चोळत बसाल, गुलाबराव पाटलांच्या आपल्याच कार्यकर्त्यांना कानपिचक्या
लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं अजितदादा म्हणाले.