अहमदनगर, 19 जुलै: साध्या सुईपासून ते कोणत्याही वाहनाच्या स्पेअर पार्ट्सपर्यंत आणि भाजीपाल्यापासून धान्य, किराणा, कपडे, चपलांपर्यंत कोणतीही वस्तू हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे अहमदनगरचा मंगळवार बाजार होय. ग्राहकाला पाहिजे ते देणारा व कष्टकऱ्यांना आणि हातावर रोजीरोटी असलेल्यांना आधार देणारा बाजार म्हणून मंगळवार बाजारची ओळख आहे. तब्बल 90 वर्षांपासून नगरमध्ये मंगळवार बाजार भरतो, असं सांगितलं जातं. रहदारीच्या रस्त्यावरच भरतो बाजार अहमदनगरमध्ये भरणाऱ्या मंगळवार बाजाराला बेग पटांगणावर जागा होती. पण पुढे हा बाजार सर्जेपुरा-मंगल गेट परिसरात स्थलांतरीत झाला. पण हा भाग वस्तीचा असल्याने येथे भाजी ओटे वा अन्य सुविधा नाहीत. रहदारीच्या रस्त्य़ांवरच हा बाजार भरतो. याच बाजारातून रहदारीही सुरू असते. पण ही रहदारी केवळ केवळ दुचाकी वाहनांची असते. चारचाकी वा मोठी वाहने आठवड्यातील अन्य दिवशी येथून जा-ये करतात. पण मंगळवार बाजारच्या दिवशी या भागात येणे टाळतात. कारण, वाहतूक कोंडीत वेळ वाया जाण्याची शक्यता जास्त असते.
बाजाराचं काळानुसार बदलतं रूप औरंगाबाद रस्त्यावरील कोठला बसथांब्यापासून आत दक्षिणेकडे मंगल गेट परिसर ते आडते बाजार कोपरा आणि पश्चिमेकडे ग्राहक भांडार ते सर्जेपुरा अशा परिसरातील या मंगळवार बाजाराचे रूपही आता काळानुसार बदलले आहे. नेहमीच्या भाजीपाला, किराणा, जुन्या वाहनांचे स्पेअरपार्ट, जुनी वाहने, टायर-ट्युब, लोखंडी औजारे, चपला-बूट, कपडे, धान्य, मिठाई-फरसाण, शेती औजारे, रद्दी, शोभेच्या वस्तू अशा अनेकविध आणि नेहमीच्या चित्राबरोबरच मोबाईल दुरुस्तीची दुकानेही येथे दिसू लागली आहेत. जुना बाजारा आणि नवा बाजार नगरमध्ये पूर्वीपासून जुन्या महापालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचा परिसर बाजाराचा समजला जात असे. पण तेथून हा बाजार महात्मा गांधी रस्त्यावर गेला. त्यामुळे पूर्वीचा परिसर आता जुना बाजार म्हणून ओळखला जातो. तर नव्या बाजाराचा परिसर आता कापड बाजार झाला आहे. या नव्या बाजाराच्या भोवती घासगल्ली, गंज बाजार, नवी पेठ, चितळे रस्ता परिसरात नवी बाजारपेठ विकसित झाली आहे. एवढेच नव्हे तर माळीवाडा, जुना बाजार, दिल्ली गेट, सर्जेपुरा या भागातही व्यावसायिक दुकाने झाली आहेत. उपनगरांपैकी सावेडी, बालिकाश्रम रस्ता, केडगाव परिसरातही व्यावसायिक पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील या ठिकाणी भवानी, रेणुका माता, सप्तश्रृंगी भगिनी आल्या होत्या एकत्र, अशी आहे आख्यायिका हा चोरबाजार नाही ग्राहकाला आता पाहिजे ती नवी वस्तू घराजवळच मिळण्याची सुविधा झाली आहे. पण काही वेगळे, जुने वा महत्त्वाचे पाहिजे असेल किंवा काही आगळेवेगळे हवे असेल तर नगरकर हमखास मंगळवार बाजारच गाठतात. हा बाजार म्हणजे मुंबईतील कथित चोरबाजारासारखा नाही. तर कष्टकऱ्यांनी कष्टकऱ्यांसाठी भरवलेला बाजार आहे. भंगार गोळा करणारे कचरा वेचक वा कपड्यांवर भांडी विकणारे आपल्याला सापडलेले वा मिळालेले लोखंडी किंवा अन्य साहित्य डागडुजी करून नव्या रुपात या बाजारात आणतात. तर काहीजण जुने कपडे स्वच्छ करून बाजारात विकायला येतात. अशा सगळ्या पार्श्वभू्मीवर ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यातही मंगळवार बाजारचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे एकाच दिवसात लाखोंची उलाढाल होणाऱ्या नगरच्या ‘मंगळवार बाजार’ची ओळख कायम आहे.