अहमदनगर, 13 जुलै: महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन शक्तिपीठांना धार्मिक महत्त्व आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी आणि माहुरची रेणुका माता ही साडेतीन शक्तिपीठं मानली जातात. ही साडेतीन शक्तिपीठं एकाच ठिकाणी असल्याची मान्यता अहमदनगरमध्ये आहे. कोल्हारचे भगवती माता मंदिर हे साडेतीन पीठांचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं. यामागं एक खास आख्यायिका आहे. कोल्हारचं भगवती माता मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात भगवतीपूरचं ग्रामदैवत म्हणून श्री क्षेत्र कोल्हार भगवतीमाता मंदिर प्रसिद्ध आहे. हे एक जागृत देवस्थान मानलं जातं. हे ठिकाण साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या या भगवतीमाता मंदिरात तुळजापूरची तुळजाभवानी माता, माहुरची रेणुका माता, वणीची सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची भगवती माता असे साडेतीन शक्तीपीठांचे एकत्रीत आणि दुर्लभ वस्तीस्थान आहे. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात.
कसे आहे भगवती माता मंदिर? श्री भगवती मातेचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे जुने बांधकाम हेमांडपंथी होते. मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यात मंदिराच्या समतलापासून 40-45 फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीपथास आला नाही. अथवा मंदिर निर्मिती संदर्भातील शिलालेख सदृश्य अन्य पुरावा सापडला नाही. त्यामुळे मंदिर अनादीकालीन असल्याची साक्ष पटते. भगवती माता मंदिरात असलेली व्याघ्रशिल्पे इ.स. 13 व्या शतकात झाली असावी, असे काही तज्ज्ञ जाणकारांचे मत आहे. कोल्हार भगवतीपूर हे पूर्वी जहागिरीचे गाव होते. पानोडीची ही जहागिरी होती. त्याकाळी म्हणजे सुमारे 250 वर्षांपूर्वी त्यांनी भगवतीमातेचे छोटेसे मंदिर बांधले असावे असे काही जाणकारांचे मत आहे. कोल्हार गावचा प्राचीन इतिहास कोल्हार भगवतीपूर हे गाव पौराणिक पार्श्वभूमीमुळे सुमारे दोन हजार वर्षापासून अस्तित्वात आहे. प्रवरा परिसरात मानवी जीवन अश्मयुगापासून अस्तित्वात असल्याचे तसेच सिंधू संस्कृतीप्रमाणेच ‘प्रवरा संस्कृती’ प्राचीन कालापासून अस्तित्वात असल्याचे डॉ. संकलिया या इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलेले आहे, असे अभ्यासक सांगतात. अन् श्रीराम यांच्यासमोर पार्वती माता सीतेचं रुप घेऊन आल्या होत्या, राज्यातील या मंदिराची अशीही आख्यायिका, Video कोल्हार भगवतीपूरबाबत आख्यायिका कोल्हार भगवतीपूर गावाच्या नावाच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा प्रचलीत आहेत. त्यापैकी एक अशी, महाभारतात वर्णिलेल्या देव-दानवांच्या अमृतमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी अमृतकुंभातील अमृत प्राशन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे दानवश्रेष्ठ राहू देवांमध्ये मिसळला. मोहिनी रूपातील विष्णुंनी त्याचे कपट ओळखून सुदर्शनचक्राने त्याचा शिरच्छेद केला. राहूच्या वधामुळे प्रवरा परिसरात देव-दानवांमध्ये झालेल्या तुंबळ युध्दामुळे एकच कोलाहल माजला. म्हणून प्रवरा तीरावरील या गावाला ‘कोलाहल-कोल्हाळ-कोल्हार’ असे नाव प्राप्त झाले अशी कथा आहे. याठिकाणी देव-दानवांचा कोलाहाल झाला. तो कोलाहाल शमविण्यासाठी श्रीशंकराने स्वत: प्रकट होऊन श्री भगवतीची स्थापना केली. श्री भगवतीदेवीने संपूर्ण राक्षसांचा नायनाट केला. देवीचे क्षेमकुशल विचारण्यासाठी भगवतीमातेच्या श्री भवानी माता, श्री रेणुकामाता, श्री सप्तश्रृंगीमाता या भगिनी येथे आल्या असल्याचे मानले जाते, असे पुजाऱ्यांनी सांगितले. आळंदीतील ग्रंथात उल्लेख आळंदीच्या एका ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वर नेवासा ते आळंदी प्रवासामध्ये असताना भगवती देवीच्या मंदिरात मुक्काम केला व पुढे प्रस्थान केले, असा उल्लेख सापडला आहे. कोल्हार भगवतीपूर येथील महादेव मंदिरामध्ये एक मोठ्या नंदीची दगडी प्रतीकृती आहे. त्या नंदीच्या पाठीमागच्या बाजूकडून पूर्वीच्याकाळी जमिनीखालून भूयार खोदलेले होते. हे भूयार थेट भगवती देवीच्या मंदिराच्या मागे पोहीच्या पलिकडे निघते. परंतु ते भुयार आता सापडत नाही. भुयाराचे पहिले द्वार श्री महादेव मंदिराच्या पिंडीखाली आहे, असे सांगण्यात येते. Maratha History: पेशव्यांचे सरदार, इंग्रजांविरुद्ध पराक्रम गाजवणारे त्रिंबकजी डेंगळे माहितीये का? पाहा हा VIDEO रामायणातील उल्लेख प्रभु रामचंद्र हे बंधू लक्ष्मण आणि पत्नी सितामातेसह पंचवटीकडे 14 वर्षांचा वनवास भोगण्यासाठी जात असतांना प्रवरानदीकाठी मुक्काम केला. प्रवरा नदीत वाळूची महादेव पिंड तयार केली. त्यांनी कोल्हाळेश्वराची येथे प्रतिष्ठापना केली. या कोल्हाळेश्वराच्या या गावाला कोल्हार असे नांव पडले असावे, असे जानकार सांगतात. या ठिकाणी त्यांना महादेव प्रसन्न झाले. पुढे याचठिकाणी मंदिर बांधण्यात आले. त्या शिवलिंगाभोवती उभारलेल्या मंदिरास कोल्हाळेश्वर नाव पडले. कोल्हाळेश्वर वरुन या गावास ‘कोल्हार’ नाव पडले असे काही जण मानतात. देवीने दृष्टांत दिल्याची आख्यायिका याच ठिकाणी भगवती मातेने अवतार घेऊन प्रभूरामचंद्रास दृष्टांत दिला. दुष्टांचा नाश करण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यामुळे भगवतीमातेच्या पदस्पर्शाने पूणित झालेल्या स्थानाला ‘भगवतीपूर’ हे नाव पडले. महिनाभराच्या यात्रोत्सव काळात व नवरात्रोस्तवाच्या काळात तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची भगवतीमाता ही साडेतीन शक्तीपीठे येथे वास्तव्य करतात असे सर्वजण मानतात.