आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबई, 18 जून : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुंबईतील वरळीमध्ये राज्यव्यापी पदाधिकारी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. आजपासूनचे तीन दिवस महत्त्वाचे असून 20 जूनचा दिवस हा जागतिक खोके दिवस असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तर, उपमुख्यमंत्र्यांनी सेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारं ट्विट आजचं केलं, त्याचं कारण दिल्लीवरुन आदेश आला असावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. आज फादर्स डे असून गेल्या वर्षी माझे वडील चोरण्याचा प्रयत्न झाल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. काय म्हणाले आदित्य ठाकरे? उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. मात्र, लोकांनी जाहिरातीची धास्ती घेतली आहे, त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आजचं दिल्या आहेत. घटनाबाह्य सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आजच दिल्या आहेत. 20 जून जागतिक खोके दिन आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडी सरकारतर्फे सुवर्णकाळ आणायचा प्रयत्न करत होतो. देशातल्या टॉप तीन मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव सलग दोन वर्ष येत होतं, असंही ते म्हणाले. सरकार पाडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे, असं विचारलं तर उद्धव ठाकरे यांचं नाव सांगितलं जातं. काही लोक दुसऱ्यांचे वडील देखील चोरतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जास्तीत जास्त महिला नगरसेवक झाल्या, महापौर देखील शिवसेनेकडून झाल्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही काय केलं हे ज्या प्रमाणं दाखवतो तसं जे सोडून गेले त्यांनी देखील दाखवावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. वाचा - भाजपमध्ये येताच आशिष देशमुखांचा मोठा निर्धार, फडणवीसांना दिला शब्द! गद्दारांना पायऱ्या दिसता कामा नये : आदित्य ठाकरे एका वर्षात गद्दारांनी मुंबईत काय केलं ते सांगावं असं आदित्य ठाकरे म्हणाले. आज मी चॅलेंज देतो. मी जे प्रेझेंटेशन देतोय जे आम्ही मुंबईत काम केलंय. असेच प्रेझेंटेशन शिंदे गटांनी द्यावे की त्यांनी मुंबईत काय काम केलं? मुंबईत जे काम झालं आहे. ते देशात कुठेही झालं नाही आणि जर झालं असेल तर मी काही पराभूत व्हायला तयार आहे. सांडपाणी प्रक्रिया करणारे प्लांटचे काम आपण केलं होतं. पण त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केलं. घनकचरा व्यवस्थापनाचं काम आपण करायला सुरुवात केली. हॉटेल आणि सोसायटीला सांगितलं की कचऱ्याच विलीगीकरण करा. मुंबई महानगर पालिकेतून कचऱ्याचं व्यवस्थापन आणखी सुरू करणार आहे. पर्यटन मंत्री म्हणून महाराष्ट्रात मी निधी दिला होता, तो निधी ठप्प केला आहे. पण एक लक्षात ठेवा आपलं सरकार आलं की यांच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार. आपण थांबलोय ते निवडणुकीसाठी थांबलो आहे. कुठच्याही निवडणूक असुद्या लोकसभा ते पंचायत या गद्दारांना पायऱ्या दिसता कामा नये, ही शपथ आपण घेऊयात.