JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बहिणीवर वादग्रस्त टीका, तरी दादा शांत का? अजित पवारांच्या मनात नेमकं काय?

बहिणीवर वादग्रस्त टीका, तरी दादा शांत का? अजित पवारांच्या मनात नेमकं काय?

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त टीका केली, पण अजित पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 नोव्हेंबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त टीका केली. सत्तार यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं. तसंच नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर राज्यपालांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, अशी मागणी केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अब्दुल सत्तारांविरोधात आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे या मुद्द्यावर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांना भेटायला गेलेल्या जयंत पाटील यांनाही अजित पवारांच्या मौनाबद्दल विचारण्यात आलं. ‘अजित पवारांनी भाष्य करण्याची गरज नाही ते त्यांच्या आजोळी काही कारणास्तव गेले आहेत आणि त्यांच्या बहिणीविषयी कोणीतरी आक्षेपार्ह बोलणं यांवर त्यांनी भाष्य करण्याची गरज नाही तसेच अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा करू नका,’ असं जयंत पाटील म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा हा त्यांचा भावा-बहिणीचा प्रश्न आहे. अजित पवार कधी काय करणार हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली. अजितदादांच्या शांततेचीही चर्चा सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार शांत का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत, पण अजित पवार शांत असण्याच्या चर्चा व्हायची ही काही पहिली वेळ नाही. मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या काही घटनांमुळे या चर्चांना पुन्हा एकदा खतपाणी मिळालं आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अजितदादांची दांडी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये अधिवेशन झालं. या अधिवेशनासाठी शरद पवार रुग्णालयातून थेट आले, पण शरद पवारांच्या उपस्थितीपेक्षा जास्त चर्चा अजित पवारांच्या गैरहजेरीची झाली. अजित पवार हे आजोळी गेल्यामुळे ते अधिवेशनाला येऊ शकले नाहीत, असं सांगितलं गेलं. तब्येत बरी नसताना सुद्धा शरद पवार शिबिराला आले, अजितदादा मात्र गायब अजित पवार-जयंत पाटलांमध्ये संघर्ष? महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. अजित पवारांना विरोधी पक्षनेता बनवल्यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याचंही बोललं गेलं. जयंत पाटील यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या. दिल्लीच्या अधिवेशनातून अजितदादा निघून गेले सप्टेंबर महिन्यात दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं. हे अधिवेशन सुरू असतानाच अजित पवार व्यासपीठावरून भाषण न करताच निघून गेले. जयंत पाटील यांना आपल्यापूर्वी भाषण करण्याची संधी मिळाल्यामुळे अजित पवार निघून गेल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवारांनी मात्र आपण वॉशरूमसाठी बाहेर गेल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला. ‘वॉशरूमला गेलो तरी….’ नाराजीनाट्याबद्दल बोलले अजित पवार अजित पवार-जयंत पाटील सिनियर कोण? पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी आपण विधानसभेत अजितदादांना सिनियर असल्याचं बोलून दाखवलं, त्यानंतरही या दोघांमधल्या संघर्षाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. सिनियर कोण? जयंत पाटील-अजित पवारांमधली सुप्त स्पर्धा पुन्हा समोर! गृहखात्यावरून खंत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी गृहमंत्रीपदाकरता आग्रह धरला होता, पण शरद पवारांनी अजित पवारांऐवजी जयंत पाटलांना गृहमंत्री केलं होतं. पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी ती खंत व्यक्तही केली होती. रोहित पवारांचा गौप्यस्फोट शिवसेना फोडल्यानंतर विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला होता. रोहित पवारांच्या या दाव्यानंतर खुद्द अजित पवारांनाच स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. ‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव’, खळबळजनक आरोपांनंतर अजितदादा रोहित पवारांशी बोलणार आता सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, पण अजित पवार यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मागच्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडणाऱ्या या घडामोडींमध्ये अजित पवारच केंद्रस्थानी आहेत, त्यामुळे अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललं आहे? अजितदादा शांत का आहेत? असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या