मुंबई, 14 एप्रिल : हृदयविकार असलेल्या व्यक्तींना डॉक्टर सहसा आराम करण्याचा सल्ला देतात. रक्ताभिसरण चांगलं राहावं यासाठी डॉक्टर या रुग्णांना फक्त सकाळ-संध्याकाळ चालण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात ही गोष्ट गरजेची असते. उन्हाळ्यात शरीराला विशेष श्रम पडतात. त्यामुळे हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा थोडे वाढतात. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांकडून आता एक नवीन इशारा देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या मते, दिवसभरात काम करताना 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोप घेतली तर ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका पाच टक्क्यांनी वाढू शकतो.‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, रोज 30 मिनिटांपेक्षा जास्त झोपेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका वाढतो, असं तज्ज्ञांना दिसून आलं आहे. जगातले चार कोटींहून अधिक नागरिक अशा स्थितीला तोंड देत आहेत. अशा व्यक्तींना सामान्य नागरिकांपेक्षा पाचपट जास्त धोका असतो. 20 हजारांहून अधिक जणांच्या डेटाचं विश्लेषण केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. या व्यक्तींच्या हृदयाचे ठोके अनियमित नव्हते; पण त्यांना झोपायला सांगताच त्यांच्या हृदयाचे ठोके अनपेक्षितपणे वाढले. हे ठोके इतके अनियमित होते, की केव्हाही हार्ट फेल होण्याची शक्यता होती. तीन गटात विभागून केलं गेलं संशोधन संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात आली. दिवसभरात कधीही डुलकी घेतली नाही किंवा झोपले नाहीत अशा व्यक्तींचा समावेश पहिल्या गटात करण्यात आला. दुसऱ्या गटातले सदस्य नियमितपणे दिवसातून किमान 30 मिनिटं झोपत होते. तिसऱ्या गटात दिवसभरात 30 मिनिटांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांचा समावेश केला गेला. ज्या व्यक्ती रोज 30 मिनिटं किंवा त्याहून अधिक वेळ झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी वेळ झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत पाच पटींनी जास्त असतो; मात्र काही मिनिटं डुलकी घेणाऱ्यांना तितकासा धोका नसतो. कमी झोप म्हणजेच कमी जोखीम डॉक्टरांनी सांगितलं, दिवसा झोप घेण्याचा आदर्श कालावधी हा 15 ते 30 मिनिटं आहे. अशा व्यक्तींना अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत हृदयाचे ठोके अनियमित वाढण्याचा धोका 56 टक्के कमी होता. स्पेनमधल्या जुआन रेमन जिमेनेझ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे डॉ. डियाझ गुटेरेझ यांनी सांगितलं, `झोपेचा आपल्या हृदयाच्या प्रणालीवर किती गंभीर परिणाम होत आहे, हे संशोधनातून आम्हाला दिसून आलं. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे. आपल्याला आता सतर्क राहिलं पाहिजे.`