मुंबई, 13 जुलै : मायग्रेन अर्थात अर्धशिशी हा मेंदूशी संबंधित वेदनादायी आजार आहे. मायग्रेन आजाराविषयी अनेकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत. मायग्रेनशी संबंधित प्रश्नांना मायग्रेन ही एक न्यूरॉलॉजिकल स्थिती आहे. या आजारात वारंवार आणि तीव्र डोकेदुखी जाणवते. यामुळे संबंधित रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. मायग्रेनविषयी अनेक गैरसमज आहेत. बेंगळुरूतल्या कावेरी रुग्णालयातल्या कन्सल्टंट न्यूरॉलॉजिस्ट आणि इपिलिटॉलॉजिस्ट डॉ. सोनिया तांबे यांनी उत्तरं दिली आहेत. या लेखात त्याबद्दलची वस्तुस्थिती जाणून घेऊया. गैरसमज 1 : मायग्रेन म्हणजे फक्त तीव्र डोकेदुखी होय वस्तुस्थिती : मायग्रेन म्हणजे फक्त गंभीर डोकेदुखी नसून, तो एक जटिल न्यूरॉलॉजिकल विकार आहे. त्यात डोकेदुखीव्यतिरिक्त वेगवेगळी लक्षणं दिसतात. मायग्रेनमध्ये अनेकदा मळमळ, उलट्या, प्रकाश आणि ध्वनीची संवेदनशीलता, व्हिज्युअल डिस्टर्बन्स यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. काही व्यक्तींना यामुळे चक्कर येऊ शकते. यामुळे विशिष्ट न्यूरॉलॉजिकल लक्षणं सूचित होतात. ही लक्षणं मायग्रेनच्या सुरुवातीला दिसतात. गैरसमज 2 : तणावामुळे मायग्रेन होतो वस्तुस्थिती : काही व्यक्तींना तणावामुळे मायग्रेन होऊ शकतो. परंतु हे एकमेव कारण नाही. मायग्रेनला अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात हॉर्मोनल बदल, विशिष्ट पदार्थ किंवा पेयांमुळे त्रास होणं, झोपेची समस्या, पर्यावरणीय घटक आणि अगदी आनुवंशिक पूर्वस्थितीचाही समावेश होतो. वैयक्तिक ट्रिगर्स ओळखता आल्यास मायग्रेनचं प्रभावीपणे व्यवस्थापन करता येऊ शकतं. गैरसमज 3 : केवळ महिलांनाच मायग्रेनचा त्रास होतो वस्तुस्थिती : महिलांमध्ये मायग्रेनची समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. पुरुषांच्या तुलनेत तिप्पट महिलांना याचा त्रास होतो; पण हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. पुरुष, मुलं किंवा किशोरवयीन मुलांनाही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. स्त्रियांना हा विकार जास्त प्रमाणात होण्याची कारणं अद्याप पूर्णपणे स्पष्ट नसली तरी हॉर्मोनल घटक यात महत्त्वाची भूमिका बजावतात असं मानलं जातं. गैरसमज 4 : मायग्रेन हा गंभीर आजार नाही वस्तुस्थिती : मायग्रेन ही एक महत्त्वपूर्ण आरोग्य स्थिती आहे, जी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम करू शकते. यामुळे रोजच्या गोष्टी करण्यात अडचणी निर्माण होतात, तसंच तीव्र वेदना जाणवतात. यामुळे प्रसंगी शाळा किंवा कामातून सुट्टी घ्यावी लागते. याशिवाय मायग्रेनमुळे नैराश्य, चिंता, तसंच हृदय किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराची जोखीम वाढू शकते. गैरसमज 5 : मायग्रेनसाठी औषधं हा एकमेव उपचार आहे वस्तुस्थिती : मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी सामान्यतः औषधं वापरली जातात. परंतु, हा उपचार एकमेव पर्याय नाही. जीवनशैलीत बदल, ट्रिगर ओळखणं आणि टाळणं, नियमित झोपेचं वेळापत्रक राखणं, तणावाचं व्यवस्थापन करणं आणि योग्य आहार घेणं या गोष्टी मायग्रेनच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. या समस्येवर विश्रांती, बायोफीडबॅक, अॅक्युपंक्चर आणि फिजिकल थेरपी यांसारखे उपायही उपयुक्त ठरू शकतात. गैरसमज 6 : मायग्रेन बरा होऊ शकतो वस्तुस्थिती : सद्यःस्थितीत मायग्रेनसाठी कोणताही उपचार नाही. तथापि, योग्य व्यवस्थापन पद्धतीद्वारे मायग्रेनचं प्रभावीपणे नियंत्रण करता येते. यामुळे अॅटॅकची वारंवारता आणि तीव्रताही कमी होते. उपचारांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार तीव्र उपचारांचा समावेश होतो. या न्यूरॉलॉजिक स्थितीचा सामना करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मायग्रेनविषयीचे गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे. मायग्रेन ही केवळ गंभीर डोकेदुखी नाही. त्याची तीव्रता एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर लक्षणीय परिणाम करू शकते. याविषयीचे गैरसमज दूर करून, योग्य माहितीचा प्रचार करून आम्ही मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी सहानुभूती, जागरूकता आणि प्रभावी व्यवस्थापन धोरणं यांना प्राधान्य देतो. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास होत असल्यास, योग्य निदान आणि वैयक्तिक उपचारांसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.