लॉकडाऊनमध्ये पतीची गेली नोकरी, पण तिने मानली नाही हार, उभारला लाखोंचा व्यवसाय
मधेपुरा, 22 मे : पती पत्नी हे दोघे संसाराच्या गाडीची दोन चाक असतात. ही दोन्ही चाक एकत्र चालली तर आयुष्याची गाडी सुसाट धावते. बिहारीगंज येथील कुस्थान गावात राहणाऱ्या कांचन कुमारीचीही अशीच कहाणी आहे. लॉकडाऊनमध्ये पतीची नोकरी गेल्यानंतर कांचन कुमारी यांनी कर्ज काढून पतीसोबत मिळून घरी बॉलपेन बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय इतका मोठा झाला आहे की कांचन कुमारी आणि पती गावातील इतर लोकांना रोजगार देत आहेत. कांचन कुमारी यांचे पती हरिलाल यादव हे मुंबईतील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करायचे. लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली. यानंतर कांचनने स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पतीशी व्यवसायासंदर्भात चर्चा करून त्यांनी घरात बॉल पेन मशिन बसवण्याचा निर्णय घेतला, पण व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल नव्हते. तेव्हा बँकेकडून आणि काही नातेवाईकांकडून त्यांनी कर्ज काढले आणि व्यवसायाला सुरुवात केली.
18 टन बॉल पेनच उत्पादन : कांचन कुमारीने बीए केले आहे, पण त्यांना नोकरी करण्याची इच्छा कधीच नव्हती. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात पती बेरोजगार झाल्यावर त्यांनी पती सोबत एकत्र काम करायला सुरुवात केली. पती हिरालाल यादव म्हणतात की, " कांचनाच्या विचारामुळे मी बेरोजगारातून उद्योगपती बनलो". कांचन कुमारी आणि पती त्यांच्या व्यवसायातून 18 टन बॉल पेनच उत्पादन करतात. त्यामुळे वर्षाला व्यवसायात जवळपास 72 लाख रुपयांची उलाढाल होत असते.
कांचन यांनी सांगितले की, “आम्ही बनवत असलेल्या बॉल पेनची गुणवत्ता खूप चांगली आहे. आम्ही दुकानदारांना 2 वर्षांची हमी देखील देतो. म्हणजे जर पेन गोदामात ठेऊन 2 वर्षाच्या आत खराब झाले तर ते परत घेतले जाईल. पेनाचा दर्जा चांगला असल्याने बाजारात याला भरपूर मागणी आहे. त्यामुळे ते अगदी सहजपणे विकले जातात. हरिलाल म्हणतात, " बाजारातून पेनसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स येत आहेत, परंतु आमच्याकडे असणारी मशीन लहान असल्यामुळे आम्हाला त्या ऑर्डर्सची पूर्तता करता येत नाही. येत्या काही दिवसांत मशीनची संख्या वाढवणार असून याने आमचे उत्पन्न वाढून आम्ही आणखी काही लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो.