नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे वेट लॉस (Weightloss) डाएट प्लॅन फॉलो करतात. किटो डाएट प्लॅन (Keto diet plan) हा त्यापैकीच एक आहे. किटो डाएटला किटोजेनिक डाएट (Ketogenic diet) असंही म्हणतात. आजकाल या डाएट प्लॅनची बरीच चर्चा असून तो लोकप्रिय होत आहे. मात्र, काही लोक डाएटिशियन (Dietitian) किंवा एक्सपर्ट्सचा सल्ला न घेताच वजन कमी करण्यासाठी या प्लॅनचा अवलंब करू लागतात. ज्यामुळे दुष्परिणामांचाही (Side Effects) सामना करावा लागू शकतो. किटो डाएट म्हणजे काय, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि तज्ज्ञांचा सल्ला न घेतल्यास त्याचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया… काय आहे किटो डाएट? दिल्लीतील साकेत भागातील मॅक्स हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ रितिका समद्दार (Dietitian Ritika Samaddar) सांगतात की, किटो डाएटची सुरुवात 1920 मध्ये झाली. हा एक थेरॅप्युटिक डाएट (Therapeutic Diet) आहे. प्रामुख्यानं एपिलेप्टिक मुलांवरील उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो. या डाएटमध्ये खूप कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहारातून पेशंटला दिली जातात. त्यामुळे एपिलेप्टिक मुलांची सीझर्सची (seizures) समस्या बरी होते. पण, आता लोकांनी वजन कमी करण्यासाठीदेखील हा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरुवात केली आहे. किटो हा हाय फॅट डाएट आहे, ज्यामध्ये शरीर ऊर्जेसाठी चरबीवर (Fats) अवलंबून असतं. जेव्हा तुम्ही ठराविक किटो डाएटचं पालन करता तेव्हा तुमच्या शरीरातील एकूण कॅलरींपैकी 80 टक्के कॅलरीज (Calories) चरबीपासून, 10 टक्के प्रोटिनपासून आणि आणखी दोन ते 10 टक्के कार्बोहायड्रेट्सपासून (Carbohydrates) तयार होणं अपेक्षित असतं. आपण जे सामान्य अन्न खातो त्यापैकी 50-60 टक्के कॅलरीज कार्बोहायड्रेट्समधून मिळतात. किटो डाएट हा सामान्य आहाराच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यात फॅट्स प्रमाण जास्त आणि कार्बोहायड्रेट खूप कमी आहेत तर प्रोटिन सामान्य आहेत. भारतीय वातावरणात ऑथेंटिक किटो डाएट फॉलो करणं खूप कठीण आहे. कारण, त्यात फक्त मांसाहारी पदार्थ आणि भाज्यांचा समावेश होतो. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, धान्य किंवा फळं यांचा समावेश होत नाही, त्यामुळे हा डाएट प्लॅन फॉलो करणं आणखी कठीण होतं. आपण फक्त एक ते दोन महिने याचा अवलंब करू शकतो. किटो डाएटचे दुष्परिणाम आहारतज्ज्ञ रितिका म्हणतात, ‘या डाएट प्लॅनचे काही शॉर्ट टर्म तर काही लाँग टर्म परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही जास्त फॅट्सचं सेवन केलं तर सुरुवातीला ड्रायनेस, चिडचिड, मळमळ, उलट्या, चक्कर येणं अशी अल्पकालीन लक्षणं दिसू शकतात. पण, जर तुम्ही पुरेसं पाणी आणि लिक्विड (Liquid) घेतल्यास या लक्षणांपासून आराम मिळू शकतो. किटो डाएटचे लाँग टर्म दुष्परिणामदेखील आहेत. जर तुम्ही डाएट प्लॅन नीट फॉलो केला नाही किंवा जास्त प्रमाणात अनहेल्दी फॅट्स घेतले तर ते हृदय आणि यकृताला हानी पोहोचवू शकतात. जर तुम्ही जास्त प्रोटिन आणि फॅट्स घेतले व पुरेसं पाणी प्यायलं नाही तर शरीरात युरिक अॅसिड वाढण्यासोबतच किडनी स्टोनही होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जेव्हा तुम्ही जास्त प्रोटिन व फॅट घेता तेव्हा त्यासोबत भरपूर लिक्विड फूड (Liquid Food) प्यावं. किटो डाएट फॉलो केल्यास शरीरात पोषकतत्त्वांची कमतरता होऊ शकते. यामुळे डोकेदुखी, थकवा, मूड स्विंग्ज, निद्रानाश, बद्धकोष्ठतादेखील होऊ शकते. या गोष्टी ठेवा लक्षात चार ते आठ आठवड्यांपेक्षा जास्त किंवा तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ किटो डाएट फॉलो करू नये. डाएटसोबत पुरेसं लिक्विड फूड घ्या. केवळ तज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांच्या देखरेखीखालीच हा डाएट फॉलो केला पाहिजे. हाय फॅट आणि लो कार्बोहायड्रेट या संकल्पना नीट पाळल्या पाहिजेत. फॅट्सच्या क्वालिटीवर (Fats Quality) विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. फॅट्सच्या नावाखाली तळलेले पदार्थ खाऊ नका असंही तज्ज्ञांचं सांगणं आहे.