JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / #HumanStory: ओळख लपविण्यासाठी रुग्ण हेल्मेट घालून आला, सेक्सॉलॉजिस्टच्या आयुष्यातील अनुभव

#HumanStory: ओळख लपविण्यासाठी रुग्ण हेल्मेट घालून आला, सेक्सॉलॉजिस्टच्या आयुष्यातील अनुभव

हा हेल्मेटधारी रुग्ण आल्या आल्या म्हणाला, डॉक्टर माझा संसार उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता दिसू लागली आहे. लोकांना वाटतं की आमचं काम विचित्र आहे. आमच्या पेशात सगळ्यात जास्त महत्त्व असतं प्रायव्हसीला आणि सिक्रसीला….

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

  कुठल्याही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवरून तुम्ही फिरत असाल, तर काही गोष्टी सगळीकडे कॉमन असल्याचं दिसतं. त्यामध्ये लॉजिंग बोर्डिंग, शौचालयं यांच्यापाठोपाठ दिसतात त्या सेक्सॉलॉजिस्टच्या जाहिराती. विविध लैंगिक समस्यांवर उपाय करण्याचा दावा करणाऱ्या अनेक डॉक्टरांच्या जाहिराती आणि त्यांचे पत्ते ठिकठिकाणी चिकटवलेले असतात. त्यात आजार बरे करण्याचा दावा असतोच आणि त्यासोबत मर्दानी ताकद वाढवण्याचा दावाही करण्यात आलेला दिसतो. कोण असतात हे डॉक्टर आणि कसा असतो त्यांचा व्यावसायिक अनुभव?


HumanStroy: माणसाच्या, माणुसकीच्या आणि हरवलेल्या माणूसपणाच्या काही निवडक गोष्टी सांगण्यासाठी आम्ही आजपासून एक नवीन मालिका सुरू करत आहोत. यातले सगळे अनुभव खरे आहेत, फक्त ओळख उघड होऊ नये म्हणून काही ठिकाणी नावं बदलली आहेत. काही थरारक, काही आनंद देणाऱ्या, काही विषण्ण करणाऱ्या तर काही अगतिक, धक्कादायक, भावुक वाटणाऱ्या या गोष्टी वाचून काय वाटतं ते नक्की कळवा..


बहुतांश ठिकाणी असे दवाखाने हे शहरातल्या सर्वाधिक गर्दीच्या भागात, दाटीवाटीच्या वस्तीत आणि छोट्याशा खोलीत असतात. तिथं जुनंपुराणं फर्निचर असतं आणि तिथले रुग्ण एकमेकांपासून चेहरा लपवत इलाज घ्यायला आलेले असतात.   आमच्या पेशात सगळ्यात जास्त महत्त्व असतं प्रायव्हसीला आणि सिक्रसीला. नुकताच घडलेला एक किस्सा. एक रुग्ण डोक्यावर हेल्मेट घालून आला. तपासण्यापूर्वी मी त्याला हेल्मेट काढून ठेवायला सांगितलं. त्याने साफ नकार दिला. त्याच्या आवाजातली नाराजी आणि मग्रुरी पाहून मी त्याला पुन्हा हेल्मेट काढायला सांगितलंच नाही. तो म्हणाला, डॉक्टर माझा संसार उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता दिसू लागली आहे. शारीरिकदृष्ट्या तो एकदम फिट आणि ठणठणीत होता, मात्र मनात अनेक गैरसमज होते. अऩेक वर्षांपासून मार्केटिंगचं काम करणारा तो तरुण अगदी कोवळ्या वयापासूनच सेक्शुअली ऍक्टिव्ह होता.  

लग्न ठरल्यावर जवळचे मित्र थट्टा करू लागले. त्याचा त्याच्यावर इतका दबाव आला की तो खरं खोटं समजून न घेता वाट्टेल ते उपाय करू लागला. दुसऱ्या राज्यातून येऊन जागा मिळेल तिथे तंबू टाकणारे आणि वाट्टेल ती जडीबुटी विकणारे जे असतात, त्यांची औषधंही पठ्ठ्यानं घेतली होती. तो अशा आजारावरचा उपाय शोधत होता, जो प्रत्यक्षात त्याला झालाच नव्हता. हळूहळू तो मन मोकळं करत गेला. हेल्मेटही काढलं. आता त्याला काउन्सिलिंगची काहीच गरज नव्हती. मग मीच त्याला पुन्हा येण्याची गरज नसल्याचं सांगितलं.   अनेक ज्येष्ठ नागरिक भेटायला येतात. त्यांना प्रत्यक्षात काहीच झालेलं नसतं. मात्र उतरत्या वयानुसार मर्दानी ताकद कमी झाल्याचं वाटू नये, यासाठीच फक्त ते येत असतात.  

त्यांना दिलासा मिळावा, यासाठी मी त्यांची फिजिकल टेस्ट करतो. त्यांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देतो. मात्र त्यांच्या समस्येवरचा खरा उपाय असतो, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं. एक फार इंटरेस्टिंग केस घडली होती. एक पेशंट लपतछपत माझ्याकडे आले होते. म्हणाले की आमची बेगम मेनोपॉजनंतर जास्तच ऍक्टिव्ह झाली आहे. इतकी की मला तिच्याशी सूर जुळवून घेणंही कठीण झालं आहे. निराश होऊन ते ही गोष्ट सांगत होते. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, औषधं दिली आणि दोघांनाही कुठेतरी फिरून येण्याचा सल्ला दिला.   त्यानंतर ते आले नाहीत. कदाचित परिस्थिती नियंत्रणात आली असावी. गजबजलेल्या गल्लीत अंधारा दवाखाना चालवणाऱ्या डॉ. खान यांचं शहराच्या मध्यवर्ती भागात टुमदार घर आहे. गुप्तरोग तज्ज्ञांच्या अशा गुप्तपणे काम करण्याच्या पद्धतीबाबत त्यांच्या मनात कुठलीही शंका नाही. बहुतांश लैंगिक समस्या या मानसिक असतात. स्वतःला ‘सिद्ध’ करण्याचा दबाव पुरुषांवर असतो. माझ्याकडे येणारे 90 टक्के रुग्ण हे त्यांच्या जोडीदारांसोबतही खुलेपणानं बोलू शकत नसतात. त्यांना लपूनछपून त्यांच्या समस्येवर उपाय हवा असतो.   आपल्या समाजात लैगिक समस्यांबाबत लोकांच्या मनात असणारे समज हे उकडलेल्या शेवयांसारखे असतात. गुंतागुंतीचे.  

बहुतांश लोकांना लैंगिक गोष्टींबाबतची काहीही माहिती नसते. चोरून आल्यासारखे येतात, काहीतरी उपचार घेतात आणि चोरासारखेच गायब होतात. अगोदर आम्ही रजिस्टर ठेवायचो. आता कॉम्प्युटरवर डेटा मेंटेन करतो. मात्र आलेल्यांपैकी किती जण आपली खरी ओळख सांगत असतील, ही शंकाच आहे.   काही दिवसांपूर्वीच एक कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींविषयी बोलत होता. माझ्यावर नंबर आला तर प्रत्येकजण तोंड दाबून हसू लागला. त्याचा अर्थ प्रत्येक सेक्सॉलॉजिस्टला बरोबर समजत असतो.   लोकांना वाटतं की आमचं काम विचित्र आहे. आम्ही दिवसभर त्याच कामात आणि त्याचा विचार असतो, असा अनेकांचा भ्रम असतो.   मी अनेकांना हे वारंवार समजावून सांगत असतो की आम्ही पेशंट जे सांगतो, ते इमॅजिन करत बसत नाही. फॅक्ट म्हणून त्या गोष्टींची नोंद करतो आणि उपचार देतो.   या क्षेत्रात मी गेल्या 20 वर्षांपासून आहे. मात्र एकही महिला आतापर्यंत पेशंट म्हणून आली नाही. सगळे पुरुष आणि तेही लपतछपत येतात.   इतक्या वर्षात मला हेच समजलंय की लैंगिक समस्या ही शारीरिक समस्या आहे, असं लोकांना वाटतच नाही. ती काहीतरी कमतरता आहे, असा अनेकांचा आजही समज आहे. त्यातल्या बहुतांश समस्या या गैरसमजांमुळेच तयार झालेल्या असतात. त्यातील अनेकांचं म्हणणं मी फक्त ऐकून घेतो, तर काहींना पुस्तकं वाचण्याचा सल्ला देतो.   (विनंतीनुसार लेखकाची ओळख लपवण्यात आली आहे. )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या