झाशी, 3 मार्च : भारतात तसंच जगभरात अनेक ठिकाणी दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षीची होळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यासाठी देशभरात मोठ्या उत्साहानं तयारी सुरू आहे. संपूर्ण देशभरात स्थानिक प्रथा-परंपरांनुसार होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी 6 मार्चला होळी आहे. या दिवशी देशभरात गुलाल आणि रंगांची उधळण होईल. महाराष्ट्रामध्ये होळीच्या दुसऱ्या म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळले जातात. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारतातील एका ऐतिहासिक शहरामध्येही होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. या शहराचं नाव आहे झाशी. उत्तर प्रदेशातील झाशी या शहराध्ये होळीच्या दिवशी रंग किंवा गुलाल खेळण्याची परंपरा नाही. झाशीत राहणारे नागरिक होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग आणि गुलाल लावतात. होळीच्या दिवशी ते रंगांना हातही लावत नाहीत. यामागे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अशी दोन्ही कारणं आहेत. ज्येष्ठ पत्रकार महेश पटेरिया यांनी या परंपरेचं अध्यात्मिक कारण सांगितलं आहे. भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला तो दिवस होळीचा होता. त्या दिवशी प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यामुळे त्या वर्षी झाशीत होळी खेळली गेली नाही. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाशीमध्ये रंग खेळले गेले. तेव्हापासून झाशीमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग आणि गुलाल खेळण्याची परंपरा सुरू झाली. यासोबतच याला एक ऐतिहासिक कारणही आहे. तरुणींवर रंग उडवाल तर…; तरुणांनो होळीआधी हे जरूर वाचा काय आहे ऐतिहासिक कारण? इतिहास तज्ज्ञ रिपुसूदन नामदेव सांगतात की, 21 नोव्हेंबर 1853 रोजी झाशीचे राजा गंगाधरराव यांचं निधन झालं होतं. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो, त्यानंतर पुढील एक वर्ष कुटुंबात कोणताही सण साजरा केला जात नाही. झाशीतील प्रत्येक रहिवासी राजा गंगाधरराव यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानत होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आलेला होळीचा सण झाशीमध्ये साजरा झाला नाही. त्या वर्षीच्या होळीला बुंदेलखंडामध्ये ‘अनरय होळी’ या नावानं ओळखतात. या दिवशी रंग खेळले गेले नाहीत. यानंतर झाशीमध्ये होळीच्या एका दिवसानंतरच रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली. आजही होळीच्या दिवशी अनेकजण महाराज गंगाधरराव यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतात आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग आणि गुलाल खेळतात. इथे अजब पद्धतीनं साजरी होते होळी; जिवंत लोकांची निघते अंत्ययात्रा, अन् मग ‘अंत्यसंस्कार’, खास आहे कारण होळी हा उत्तर भारतातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होते. भांग टाकलेल्या दुधाचे अनेक ग्लास रिचवले जातात. या सर्व पार्श्वभूमीवर झाशीतील नागरिकांनी मात्र, या सणाचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वेगळेपण आजही जपलं आहे.