मुंबई, 14 जुलै : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. घाऊक बाजार टोमॅटोची आवक कमी होत असल्याने दराने उच्चांक गाठला आहे. टोमॅटोचे दर घाऊक बाजारामध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलो तर किरकोळ बाजारात हाच दर 150रुपयांपर्यंत गेल्याचे दिसत आहे. याचाच परिणाम आता हॉटेल व्यावसायिकांवर झालाय. अनेक हॉटेलमधून टोमॅटो गायब झालेत. टोमॅटोचं भाजीतील प्रमाण कमी करण्यात आलंय. त्याचबरोबर मुंबईच्या प्रसिद्ध टोमॅटो वडापावला देखील याचा फटका बसलाय. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या धारावी परिसरात जुना पोस्ट ऑफिस संत रोहिदास मार्गावर गेल्या दहा वर्षापासून महेंद्र काळे हे वडापावचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या याच स्टॉलवर टोमॅटो वडापाव हा प्रसिद्ध झाला होता. सध्या गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या दराने काही काळ हा वडापाव बंद असणार आहे. मुंबईतील अनेक खवय्ये याठिकाणी टोमॅटो वडापावची चव चाखण्यासाठी येत असतात. पेट्रोलपेक्षाही सध्या टोमॅटोचे दर वाढल्याने हा वडापाव विक्री करणे परवडत नाही, त्यामुळे तो बंद करण्यात आलाय.
‘आम्ही गेल्या दहा वर्षांपासून धारावीमध्ये वडापावचा व्यवसाय करतो. काही महिन्यांपूर्वी आम्ही नवीन फ्युजन म्हणून टोमॅटो वडापाव सुरू केला होता. त्यंत वेगळा आणि चविष्ट असलेल्या या वडापावला मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं. लांबून लांबून ग्राहक धारावीत येत होते. सध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही काही काळ वडापाव बंद करण्याचा निर्णय घेतलाय,’ अशी माहिती या वडापावचे मालक महेंद्र काळे यांनी दिलीय. कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा बटाटा वडा आणि टोमॅटो वडाचे दर हे सारखे होते. सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडावं म्हणून आम्ही दोन्हीचा दर समान ठेवला होता. हे दर कमी झाल्यावर पुन्हा एकदा टोमॅटो वडापाव सुरू करू, असं काळे यांनी स्पष्ट केलं.