भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली 15 जून : घरची परिस्थिती बेताची… त्यातच आई - वडिलांचं आजारपण…. त्यांच्याकडं लक्ष देण्यासाठी शिक्षण सुटलं… आई वडिलांच्या निधनानंतर लॉकडाऊनचं संकट… खिशात होते फक्त 300 रुपये. एकापाठोपाठ आलेल्या मोठ्या संकटांमुळे कोणताही व्यक्ती खचून जाईल. पण, डोंबिवलीच्या ओमकारनं या सर्वांवर मात केलीय. तो बिनधास्तपणे या संकटांना भिडला. आज त्यानं वडापाव व्यवस्थात स्वत:चा ब्रँड तयार केलाय. संकंटांची मालिका ओमकरच्या वडिलांना पोलिओ झाल्याने त्रास होता. ते एका खाजगी बँकेत नोकरी करत. काही दिवसांनी त्यांची नोकरी सुटली. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची. ओमकारच्या शाळेची फी भरणेही त्यांना कठीण होते. ओमकरच्या शाळेतील शिक्षिका त्याची फी भरत. ओमकारच्या आईची तब्येतही काही वर्षांनी खालावली. त्यामुळे त्याला 12 वी नंतर शिक्षण सोडावं लागलं. 2018 साली सुरुवातीला आई आणि नंतर लगेच बाबा गेले. त्यानंतरचे दिवस अतिशय बिकट होते, असं ओमकार सांगतो.
खिशात फक्त 300 रुपये ओमकारने काही दिवस नोकरी केली. पण, लगेच लॉकडाऊन लागले. त्यामुळे त्याला घरी बसावं लागलं. नोकरी करून कमावलेले पैसे संपू लागले. त्याच्याकडे फक्त 300 रुपये उरले होते. हे 300 रुपये किती दिवस पुरणार? हा मोठा प्रश्न होता. त्यामधूनच त्यानं वडा-पावची विक्री सुरू केली. या सर्व काळात मित्रांनी मोठी मदत केली, असं ओमकारनं सांगितलं. 300 रुपयांमध्ये कसं जमवलं? ‘माझ्याकडं फक्त 300 रुपये होते. घरी फ्रिज नव्हता. त्यामुळे 300 रुपयांमध्ये वडा पाव बनवण्यासाठी लागणारं सामान खरेदी केलं. त्यामध्ये तयार होतील तेवढेच वडापाव विकले. त्यानंतर आलेल्या पैशांमधून पुढील सामान आणले. मला या कामात मित्रांनीही मोठी मदत केलीय. माझा व्यवसाय स्थिर होऊ लागला तशा एक-एक वस्तू खरेदी केल्या. सर्वात प्रथम फ्रिजची खरेदी केली,’ असा अनुभव ओमकारनं सांगितला. 25 पैशांना विकत होते वडापाव, आजही दुकानातून कुणी जात नाही उपाशी, VIDEO पाहून कराल कौतुक बिनधास्त वडापाव का? ‘मी लॉकडाऊनमध्येच वडापावचा व्यवसाय सुरू केला. माझे मित्र गाडीवरून कोणतेही शुल्क न घेता वडापावची डिलिव्हरी करत असतं. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणे अवघड होते. त्या काळात मी आणि माझ्या मित्रांनी रात्री उशीरापर्यंत ग्राहकांना होम डिलिव्हरी दिली. आम्ही बिनधास्तपणे हा व्यवसाय करत असल्यानंच या वडापावचं नाव बिनधास्त ठेवलं,’ असं ओमकारनं सांगितलं. 6 महिन्यांचा खंड आणि… ओमकारनं परिस्थिती सुधारल्यानंतर एक हातगाडी चालवायला सुरूवात केली. वडापाव खाण्यासाठी ग्राहकांची गर्दीही होत होती. पण, वडापावच्या तळणामुळे त्याला ब्रोंकायटीस झाला. डॉक्टरांनी व्यवसाय बंद करण्याचा सल्ला दिला.ओमकारनं 6 महिने व्यवसाय बंद ठेवला. त्या कालावधीमध्ये मिळेल ती नोकरी केली. पण, त्याला वडापाव बनवण्याची आवड स्वस्थ बसू देईना. त्यानं आता मित्राच्या मदतीनं पुन्हा एकदा हा व्यवसाय सुरू केला आहे. कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा ओमकारला परिस्थितीनं जगायलाच नाही तर लढायला शिकवलं. आई-वडिलांची सेवा करत असताना तो जेवण बनवायाला शिकला. कोणताही पदार्थ मनापासून केला तर तो चविष्ट होतो, या आईनं दिलेल्या प्रेमळ सल्ल्यामुळेच त्यानं बिनधास्त वडापाव हा ब्रँड सुरू केला. डोंबिवलीत या वडापावच्या तीन ते चार शाखा लवकरच सुरू होत असल्याचं, त्यानं स्पष्ट केलं.