कानात मळ जमा झालाय? मग या सोप्या पद्धतींचा वापर करून करा साफ
हवेतील प्रदूषण, धूळ, माती, इत्यादींमुळे कानात मळ साचत असतो. काही दिवस तो साफ केला नाही तर कान जड होणे, कानाला खाज येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. कानात मळ साचल्यावर बरेचजण त्याला साफ करण्यासाठी माचीसच्या काड्या, सेफ्टी पिन, गाडीची चावी, इअरबड्स अशा गोष्टी वापरतात, परंतु असे करणे अत्यंत धोकादायक असते. यात जराजरी निष्काळजीपण झाला तर कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. तेव्हा कानातील मळ साफ करणे जरी महत्वाचे असले तरी त्यासाठी योग्य पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. तेव्हा आज आम्ही तुम्हाला कानात जास्त घाण जाण्याची लक्षणे आणि ते कसे स्वच्छ करावे हे सांगणार आहोत. कानात मळ जमा झाल्याची लक्षणे : 1. कानाला खाज येणे 2. कान दुखणे 3. कानाची श्रवणशक्ती कमी होणे. 4. कानात विविध प्रकारचे आवाज येणे. कानातील मळ स्वच्छ करण्याच्या पद्धती : बेकिंग सोडा: हेल्थ लाईनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार बेकिंग सोडा कानातील मळ स्वच्छ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा साधारण अर्धा कप कोमट पाण्यात मिसळून ड्रॉपर बाटलीत ठेवा. तुम्ही एकावेळी ५ ते १० थेंब कानात टाकू शकता आणि एक तासानंतर कान स्वच्छ पाण्याने धुवा. इअरवॅक्स ड्रॉप: कानातील मळ काढण्यासाठी त्याला आधी मऊ करणे गरजेचे असते. तेव्हा हा इअरवॅक्स काढण्यासाठी मेडिकलमध्ये अनेक ड्रॉप्स मिळतात. तेव्हा कानातील मळ काढण्यासाठी असे काही ड्रॉप्स तुम्ही ५ ते ७ दिवस करू शकता. कानात साचलेली घाण साफ होईल. जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा : अनेकदा घरगुती पद्धतींचा अवलंब करून देखील कानातील मळ बाहेर येत नाही. तेव्हा अशा परिस्थितीत तुम्ही जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.