2 इंच खिळा शिरला डोक्यात
चेन्नई, 15 जून : वैद्यकीय क्षेत्रातल्या अचंबित करणाऱ्या घटनांविषयी आपण बरेचदा ऐकतो. एखाद्या भीषण अपघातात किंवा घटनेतून एखादी व्यक्ती वैद्यकीय उपचारांमुळे आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मृत्यूच्या दाढेतून परतल्याचे आपण पाहतो. उत्तर प्रदेशातल्या एका कामागाराची कहाणी अशीच काहीशी आहे. प्रगत वैद्यकीय उपचार आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ही व्यक्ती अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. काम करताना एका सहकाऱ्याच्या हातून नेल गन लागल्याने या व्यक्तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दोन इंचाचा खिळा घुसला होता. पण अवघड शस्त्रक्रियेनंतर ही व्यक्ती आता पूर्ण बरी झाली आहे. ही घटना नेमकी कशी घडली,ते सविस्तर जाणून घेऊया.`टाइम्स ऑफ इंडिया`ने या विषयीची माहिती दिली आहे. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी एका व्यक्तीला सहा तासांच्या अवघड शस्त्रक्रियेनंतर जीवदान दिलं. एका कामागाराच्या डोक्यातला दोन इंची खिळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. चार जुलैला कारखान्यातल्या एका सहकाऱ्याकडून नेल गन चुकून मागे लागली. तेव्हा त्या गन मधला खिळा या व्यक्तीच्या डोक्याच्या बाजूला घुसला. डॉक्टरांनी खिळा काढण्यासाठी या व्यक्तीच्या डोक्याला छिद्र पाडलं. या अवघड शस्त्रक्रियेनंतर सहा जुलै रोजी या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उत्तर प्रदेशातल्या मछली गावातील 23 वर्षांच्या ब्रह्मासोबत ही घटना घडली. या अपघातातून तो आश्चर्यकारकरित्या बचावला. शस्त्रक्रिया झाल्यावर दोन दिवसांनी ब्रह्मा चालू लागला. तो चालत रुग्णालयाच्या कॉन्फरन्स रुममध्ये आला. या वेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य टिपलं.``डॉक्टरांनी आता टाके काढले आहेत,``असे ब्रह्माने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.``मी खाऊ शकतो,चालू शकतो तसंच सहजपणे बोलूही शकतो. मला आता खूप चांगलं वाटत आहे. मी आता पुन्हा कामावर जाण्यासाठी उत्सुक आहे,``असं ब्रह्माने सांगितलं. ``शस्त्रक्रिया झाल्यावर ब्रह्मा शुद्धीवर आला. तो सावध होता. तसंच त्याला हातापायाची हालचाल करण्यास कोणतीही अडचण येत नव्हती. त्याला दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता तो पूर्वीप्रमाणे त्याचं काम करू शकतो,``असे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती रेला रुग्णालयाचे सीईओ डॉ. इलनकुमारन कालियामूर्ती यांनी दिली. वाचा - पीसीओएसच्या समस्येमुळे गरोदर राहण्यात अडचणी येतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात 4 जुलै रोजी हा अपघात घडला. नवलूर येथील कारखान्याच्या पॅकेजिंग युनिटमध्ये ब्रह्मा फरशी साफ करत होता. त्यावेळी त्याचे सहकारी नेल गनने लाकडी खोकी सील करत होते. त्यावेळी ब्रह्माने त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला अचानक तीव्र वेदना झाल्याची तक्रार केली. त्याला तीव्र रक्तस्त्राव होत होता. फ्लोअरवरील कर्मचाऱ्यांनी त्याला शांत केले. या वेळी त्यांना एक खिळा दिसला. या खिळ्याचा आकार पेन्सिल सेल एवढा होता. हा खिळा ब्रह्माचं डोकं आणि मान यांमधल्या भागात घुसला होता. खिळा सहकाऱ्याच्या नेल गनमधला असल्याचं लक्षात आलं. ``त्यानंतर ब्रह्माला रेला रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी तो शुद्धीवर आणि सावध होता. त्याच्या हातापायात अशक्तपणा जाणवत नव्हता. त्याचे ब्लडप्रेशर आणि पल्स रेट नॉर्मल होता. ही गोष्ट आणि त्याचं कमी वय हा आमच्यासाठी मोठा फायदेशीर घटक ठरला,``असं रुग्णालयाचे कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. एम. अन्बुसेल्वम यांनी सांगितलं. ``परंतु, हा खिळा ब्रह्माच्या कवटी आणि मणक्याच्या क्रॅनीओव्हर्टिब्रल जंक्शन कॉम्प्लेक्स ट्रान्सिशनल झोनमध्ये त्वचेच्या किमान अर्धा इंच आत होता. या ठिकाणी विविध घटकांचे जटिल संतुलन असते. हा खिळा डाव्या बाजूच्या व्हर्टिब्रल आर्टरी जवळ होता. यामुळे तिथे इजा झाल्यास बोलण्यात समस्या,पॅरालिसिस किंवा प्रसंगी मृत्यूही होऊ शकला असता,``असे डॉ. अन्बुसेल्वम म्हणाले. ``सीटी स्कॅनमध्ये हा खिळा साधा किंवा लहान नसल्याचे दिसून आले. लाकडात हातोड्याने ठोकल्यानंतर हा खिळा सहजपणे काढता येऊ नये किंवा त्याला कुठलीही बाधा होऊ नये अशा दृष्टिने खिळ्याच्या खालचा भाग डिझाईन केलेला होताखिळ्याचा खालचा भाग आटे नसल्याने गुळगुळीत होता व त्याला काही अटॅचमेंटही होती,``असं डॉक्टर अन्बुसेल्वम यांनी सांगितलं. त्यामुळे ब्रह्मावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.``रुग्णाचे चेहरा बेडवर टेकवून हा खिळा हळूवारपणे काढता यावा यासाठी डॉक्टरांनी डायमंड बर्र नावाच्या विशेष न्यूरोसर्जरी उपकरणाचा वापर केला. या उपकरणामुळे सावकाशपणे खिळ्याच्या बाजूला ड्रिलिंग करणं शक्य झालं. खिळ्याचा खालचा गुळगुळीत भाग उघडा पडल्यावर ड्रिलिंग करून हा खिळा हळूवारपणे काढण्यात आला आणि सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे प्राण वाचले,``असे डॉक्टरांनी सांगितले.