प्रतीकात्मक फोटो
मुंबई, 11 फेब्रुवारी : माणसाच्या शरीराला पौष्टिक अन्नाबरोबरच पुरेशा झोपेचीही गरज असते. दिवसभर थकलेल्या शरीराला विश्रांतीसाठी काही काळ झोप घेणं आवश्यक असतं. त्यामुळे शरीर व मनाला आलेला थकवा कमी होतो, कार्यक्षमता वाढते. अपुऱ्या झोपेचे अनेक दुष्परिणाम असतात. सततच्या अपुऱ्या झोपेमुळे काही आजारही पाठी लागू शकतात. हे टाळण्यासाठी पुरेशी व चांगली झोप घेणं गरजेचं असतं. काही जणांना अंथरूणावर पडल्यापडल्या झोप लागत नाही. काहींची झोप सतत चाळवते. अशा वेळी आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास झोप लागण्यास मदत मिळू शकते. पुरेशी व शांत झोप झाली तर सकाळी उठून ताजंतवानं वाटतं. मात्र तसं न झाल्यास दिवसभर डोकं दुखणं, थकवा येणं, कामात लक्ष न लागणं, झोप येणं अशा समस्या येतात. दिवसभर खूप काम झालं असेल, तर अंथरूणावर पडल्यापडल्या झोप लागते. मात्र काही जणांच्या बाबतीत तसं होत नाही. पडल्यापडल्या झोप लागली, तरी थोड्या वेळानं जाग येते व पुन्हा झोप लागत नाही. अशा झोपेच्या तक्रारींमुळे व्याधी मागे लागतात. पुरेशा झोपेमुळे शरीरातल्या अवयवांचं कार्य सुरळीत राहतं. मेंदूचं काम सुधारतं. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीनं पुरेशी व शांत झोप घेतली पाहिजे. काही पदार्थांच्या सेवनामुळे रात्रीची चांगली झोप मिळण्यास मदत होते. भात : रात्रीच्या जेवणात भात न खाणारे अनेक आहेत. डायबेटिस झालेल्या व्यक्ती तर भात वर्ज्यच करतात. तसंच वजन वाढतं म्हणूनही काही जण भात खात नाहीत. मात्र तांदळात फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात. त्यात कर्बोदकं भरपूर असतात. त्याचा जीआय इंडेक्सही जास्त असतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक तास भात खाल्ला तर झोप चांगली लागते. दूध : झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध पिणं झोप येण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. दुधात असलेल्या Typtophan आणि Serotoninमुळे चांगली झोप लागते. नट्स : सुकामेवा आरोग्यासाठी खूप उत्तम असतो. शांत झोप येण्यासाठीही त्याची मदत होते. त्यात अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. त्यामुळे डायबेटिस आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. मेलॅटोनिन भरपूर असल्यामुळे त्यांच्या सेवनानं झोप चांगली लागते. चेरी : झोपण्याआधी एक मूठ चेरी खाल्ल्यास छान झोप लागते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चेरीचा ज्युसही पिता येऊ शकतं. ताज्या चेरी उपलब्ध नसतील, तर फ्रोझन चेरीही फायदेशीर ठरू शकतात. चेरीमध्ये असलेलं मेलॅटोनिन शरीराचं कार्य सुरळीत करण्यास मदत करतं. कॅमोमाईल टी : यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते तसंच ताण व भीतीही कमी होते. त्वचेचं आरोग्य सुधारतं. यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे मेंदूतल्या रिसेप्टर्सना चालना मिळते. यामुळे झोप चांगली लागते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रात्री 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. वारंवार अपुरी झोप होत असेल तर वजन वाढणं, डिमेन्शिया अशा समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुरेशी व शांत झोप गरजेची असते.