मुंबई, 12 डिसेंबर: सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन चांगलंच तापलं आहे. शेतकरी आंदोलनाचं (Farmers Protest) समर्थन करणासाठी पोहोचलेल्या माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे वडिल योगराज सिंगनी (Yograj Singh) हिंदूंबाबत कथित रुपाने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर योगराज सिंग यांच्या अटकेची मागणी केली जात होती. आता त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटामध्ये योगराज सिंग भूमिका साकारणार होते. पण त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे. योगराज सिंह यांनी हिंदू आणि महिलांबद्दलही भडखाऊ भाषण केलं होतं. काय म्हणाले होते योगराज सिंग? ‘हे हिंदू गद्दार आहेत, 100 वर्ष त्यांनी मुगलांची गुलामी केली,’ असं योगराज सिंग भाषणादरम्यान म्हणाल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी महिलांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. प्रकरण अंगाशी आल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली होती.
याआधीही योगराज सिंग त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होते. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या बाबतीतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. युवराजला भारतीय टीममधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर त्याला टीममध्ये जागा मिळत नव्हती, म्हणून योगराज सिंग यांनी धोनीला जबाबदार धरलं होतं.