मुंबई 26 एप्रिल: नव्वदच्या दशकात बॉलिवूड (Bollywood) गाजवणारी अभिनेत्री आयशा जुल्का(Ayesha Jhulka) ही त्या वेळची एक आघाडीची नायिका होती. तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट होत होते. 1991 मध्ये आलेल्या ‘कुर्बान’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आयशा जुल्काची मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जीता वही सिकंदर’मधील(Jo Jeeta wohi Sikandar) आमिर खानबरोबरची भूमिका गाजली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. हिंदी चित्रपटांबरोबर तेलगू, कन्नड आणि उडिया चित्रपटांतही तिनं काम केलं; मात्र यशाच्या शिखरावर असतानाच तिनं अचानक बॉलिवूड सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला. 48 वर्षीय आयशा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आपल्या व्यवसायात आणि सामाजिक कार्यात रममाण झाली आहे. आयशाच्या बॉलिवूड सोडण्याबरोबरच तिच्या आई नहोण्याच्या निर्णयाबद्दलही चाहत्यांना नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे; पण आयशानं याबाबतीत कधीच काही उत्तर दिलं नव्हतं. अलीकडेच तिनं टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या या निर्णयांबद्दल खुलासा केला. आयशानं 2003 मध्ये बांधकाम व्यावसायिक (Construction Tycoon) समीर वाशि(Sameer Washi)याच्याशी लग्न केलं. खूप लहान वयात चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली असल्यानं तिला सामान्य आयुष्य जगायचं होतं त्यामुळं लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं. हे आयुष्य आपण खूप आनंदानं जगत असून,बॉलिवूडपासून दूर राहण्याचा आपला निर्णय योग्य होता, असा विश्वासही तिनं व्यक्त केला. आयशा आणि समीर वाशि यांच्या लग्नाला आता 17 वर्षं झाली आहेत;पण त्यांना मूलबाळ नाही. यामागचे कारण स्पष्ट करताना आयशा म्हणाली, ‘मला मुलं नको होती म्हणून मला मुलं नाहीत. मी माझा व्यवसाय आणि सामाजिक कार्ययामध्ये खूप व्यस्त असते. माझा बराचसा वेळ आणि ऊर्जा त्यामध्ये खर्च होते. त्यामुळं मी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आणि मला आनंद आहे की संपूर्ण कुटुंबानं माझा निर्णय स्वीकारला. माझ्या नवऱ्यानंही माझ्या निर्णयाचा आदर केला मला पाठिंबा दिला.’ आपला नवरा अतिशय चांगली व्यक्ती असल्याचं सांगत,आयशानं त्याचं कौतुक केलं. ती म्हणाली, ‘समीरनं माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात साथ दिली. मलास्वातंत्र्य दिलं. कधीही कोणत्याही गोष्टीसाठी दबाव आणला नाही. मला जे करायचं होतं त्यासाठी मला पाठिंबादिला,त्याच्यामुळे माझं आयुष्य सुंदर झालं आहे.’ आयशा आता सम्रॉक कन्स्ट्रक्शन कंपनी, एक क्लोदिंग लाईन आणिगोव्यातीलस्पा आणि बुटीक रिसॉर्टच्या कामाचा व्याप सांभाळते.