तेलंगणा, 19 मे : कोरोना विषाणूने (Corona) गेल्या वर्षभरात जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बराच काळ अपरिहार्यपणे राष्ट्रव्यापी लॉकडाउन (Lockdown) करावा लागला. त्यातून थोडं बाहेर पडत आहोत असं वाटत असतानाच विषाणूने पुन्हा डोकं वर काढलं. आता देशव्यापी लॉकडाउन नसला तरी काही राज्यांनी, काही शहरांनी/जिल्ह्यांनी लॉकडाउन केला आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यातून कुठलंच क्षेत्र सुटलेलं नाही. त्यामुळे मनोरंजन क्षेत्र तरी त्याला अपवाद कसं असणार? सेलेब्रिटी तसंच सध्या ज्यांची चलती आहे, अशा बड्या कलाकारांना आर्थिकदृष्ट्या फारशी काही झळ पोहोचलेली नाही. केवळ घरात बसून राहणं एवढंच त्यांच्यासाठी आव्हान आहे. पण एकूण सिनेमासृष्टीचा विचार केला, तर अशा कलाकारांचं प्रमाण मोजकं आहे. हातावर पोट असलेल्या कलाकारांची संख्या मोठी असून, वृद्ध कलाकारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. या कलाकारांना लॉकडाउनचे गंभीर परिणाम सोसावे लागले आहेत. दक्षिण भारतीय सिनेमांतल्या लोकप्रिय, ज्येष्ठ अभिनेत्री पावला स्यामला (Pavala Syamala) यांनाही सध्या आर्थिकदृष्ट्या बिकट काळातून जावं लागत आहे. पैशांसाठी त्यांना चक्क आपले पुरस्कारही (pavala syamala sold awards) विकावे लागले आहेत. आता सोशल मीडियावर अनेक लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. हे वाचा - श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनाने घेतला दोन जवळच्या व्यक्तींचा बळी पावला स्यामला या दक्षिण भारतीय सिनेमातल्या प्रसिद्धअभिनेत्री (Telugu Actress) आहेत. पडद्यावरच्या विनोदाच्या उत्कृष्ट टायमिंगसाठी त्यांना ओळखलं जातं. आतापर्यंत त्यांनी जवळपास 250 सिनेमांमध्ये काम करून लोकांचं मनोरंजन केलं आहे. आजच्या घडीला मात्र त्यांना आपल्याला मिळालेले पुरस्कारही घरखर्चासाठी विकावे लागले. उत्पन्नाचं कोणतंही माध्यम त्यांच्या हातात नाही आहे. “मी गरिबी पाहिली आहे. पण इतकी बिकट परिस्थिती मी पहिल्यांदाच अनुभवते आहे. मला या गरिबीची भीती वाटते आहे. माझ्या मुलीच्या पायाला जखम झाल्यामुळे गेले काही महिने ती अंथरुणाला खिळलेली आहे. त्यातच तिला टीबीही आहे. त्यामुळे महिन्याला तिच्या उपचारांसाठीच 10 हजार रुपये खर्च येतो” “कोरोनाच्या भीतीमुळे कोणी मदतीसाठीही पुढे येत नाही. तेलंगण सरकारकडून वृद्धांना दिलं जाणारं पेन्शन (Pension) गेले काही महिने मिळालेलं नाही. त्यामुळे माझा आणि मुलीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. रोजचा खर्च भागवणं कठीण झालं आहे. अखेर मी मला मिळालेले पुरस्कारही विकून टाकले”, असं पावला यांनी एका चॅनेलशी बोलताना सांगितल्याचं वृत्त अमर उजाला ने दिलं आहे. हे वाचा - ‘द फॅमिली मॅन 2’च्या ट्रेलरमधील ‘या’ अभिनेत्याने 6 महिन्यांपूर्वी केली आत्महत्या तेलुगू अभिनेत्री असलेल्या पावला स्यामला यांनी नेनु लोकल, माथु वाडालारा अशा अनेक चित्रपटांत पावला अभिनय केला आहे. गेल्या आठवड्यात कॉमेडियन कल्याणीने त्यांना 10 हजार रुपयांची मदत केली. तसंच सुपरस्टार पवन कल्याण, चिरंजीवी हेदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांची हक्काची पेन्शनही कोरोनाच्या कठीण काळात त्यांना मिळत नाही. अशीवेळ आणखीही कित्येक कलाकारांवर आली आहे.