मुंबई, 02 जानेवारी: हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे प्रसिद्ध स्टॅडअप कॉमेडिअन मुनव्वर फारुखीला (Munawar Fruqui Arrested) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबतच्या आणखी चार जणांना इंदौर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इंदौरमध्ये नववर्षानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मुनव्वरचा शो आयोजित केला होता. शोदरम्यान मुनव्वरने हिंदू देवता, राम - सीता तसंच अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कोण आहे मुनव्वर फारुखी? मुनव्वर फारुखी गुजरातमधील जुनागढचा रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून मुनव्वरने स्टॅड अप कॉमेडीचे शो करायला सुरुवात केली आहे. त्याने याआधी देखील हिंदू देवतांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती असा त्याच्यावर आरोप आहे. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाबद्दलही वक्तव्य केलं होतं.
त्या दिवशी काय घडलं? इंदौरमध्ये मुनव्वरचा शो सुरू होता त्यावेळी तिथे भाजपचे आमदार मालिनी लक्ष्मणसिंग गौर यांचा मुलगा एकलव्यसिंग गौर उपस्थित होते. त्यांनी मुनव्वरच्या शोवर आक्षेप घेत त्याचा शो बंद करायला लावला आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई झाली. फारुखीवर कलम 295- ए आणि कलम 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या ट्वीटरवर व्हायरल झाला आहे.