मुंबई, 08 डिसेंबर: शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest) फटका शाहीद कपूरच्या (Shahid Kapoor) सिनेमाच्या शूटिंगलाही बसला आहे. शाहीद चंदीगडमध्ये जर्सी (Jersey) या सिनेमाचं शूटिंग करत होता. पण शूटिंगदरम्यान शाहीद आणि त्याच्या टीमला रोडब्लॉकचा सामना करावा लागला. कसौली आणि डेहराडूनला जाण्याआधी जर्सीच्या टीमला उत्तर भारतामधील काही शहरात फिल्मचं शूटिंग करायचं होतं. पण रस्ते बंद असल्यामुळे त्यांना तिथे पोहोचता आलं नाही. देहरादूनला होणार पुढील शूटिंग जर्सी सिनेमाचं शूटिंग मेकर्सना चंदीगडमध्ये करायचं होतं पण तिथे शूटिंग करणं कठीण जाईल असं वाटल्याने मेकर्सनी शूटिंगचं लोकेशन चेंज करत देहरादून गाठलं. सिनेमाच्या शूटिंगला जवळपास तीन दिवस बाकी आहेत. हे शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी शूटिंग चंदीगड इथे होणार आहे. तोपर्यंत शेतकरी आंदोलन निवळलं असेल अशी शक्यता निर्मात्यांनी वर्तवली आहे.
जर्सी या सिनेमाचं दिग्दर्शन गौतम टिन्नानूरी यांनी केलं आहे. या सिनेमामध्ये शाहीद कपूरसोबत मृणाल ठाकूरही दिसणार आहे. जर्सी हा सिनेमा तेलुगू भाषेतील जर्सीचा रिमेक आहे. या सिनेमात शाहीद कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही फिल्म कधी रीलिज होणार याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नसली तरी शाहीदला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असल्यामुळे त्याचे चाहते उत्सुक आहेत.