मुंबई, 5 मार्च : भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकचं (Saina Nehwal Biopic) पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं, पण या पोस्टरवर सोशल मीडियात टीका करण्यात आली, तसंच ट्रोलही करण्यात आलं. पोस्टरमध्ये बॅडमिंटनचं शटल वरच्या बाजूला दाखवण्यात आलं आहे, पण बॅडमिंटन या खेळात सर्व्हिस खालून करण्यात येते, तर टेनिसमध्ये सर्व्हिस वरून होते. यावरून अनेकांनी चित्रपटाच्या पोस्टरला ट्रोल केलं. काहींनी तर चित्रपट बनवणारे सायना आणि सानिया यांच्यामध्येच गोंधळले, असल्याचा निशाणा साधला. हे पोस्टर बॅडमिंटनच्या नियमांविरोधात जात आहे, असं अनेकांनी सोशल मीडियावर सांगितलं. तर बॅडमिंटनमध्ये अशाप्रकारे सर्व्हिस करता येत नाही. वरून सर्व्हिस करण्यात आली, तर तो बॅडमिंटनच्या नियमाप्रमाणे ‘फॉल्ट’ असतो, असंही काहींनी दाखवून दिलं आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते (Amol Gupte) यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या कल्पक पोस्टरबाबत मला स्पष्टीकरण द्यावं लागतंय, हे दुर्दैवी असल्याचं अमोल गुप्ते म्हणाले. ‘सोशल मीडियावर बरेच अनुमान लावले जात आहेत. टेनिस सर्व्ह दिसत आहे. सायना सानियाची भूमिका करत आहे, इत्यादी इत्यादी. जर सायना उडणारी शटल आहे, तर राष्ट्रीय रंगाच्या मनगटावरच्या बॅण्डसह मुलीचा हात सायनाच्या उंचीपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा असलेल्या भारतीय मुलीचा हात आहे. राहुल नंदाच्या एवढ्या कल्पक पोस्टरबाबत एवढ्या लगेच प्रतिक्रिया देण्यात येत आहे आणि मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागत आहे, हे दुर्दैवी आहे. काहीही बकवास, करण्याच्या आधी विचार करत नाहीत, विचार करा,’ अशी फेसबूक पोस्ट अमोल गुप्ते यांनी लिहिली आहे.
26 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परिणीती चोप्रा या चित्रपटात सायनाची भूमिका साकारत आहे. याचसोबत चित्रपटात परेश रावल आणि मानव कौल हेदेखील प्रमुख भूमिकेत दिसतील. याआधी बॉलीवूडमध्ये मेरी कोम, एमएस धोनी आणि मिल्खा सिंग या खेळाडूंचा बायोपिक बनवण्यात आला. मेरी कोमच्या बायोपिकमध्ये प्रियांका चोप्रा, धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांतसिंग राजपूत आणि मिल्खा सिंगच्या बायोपिकमध्ये फरहान अख्तर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता या यादीमध्ये परिणीती चोप्राचा समावेश होणार आहे.