हैदराबाद, 27 डिसेंबर: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रजनीकांत यांच्या ब्लड प्रेशर आता नियंत्रणात असल्याची माहिती डॉक्टरांच्या टीमने दिली आहे. सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची प्रकृती खालावल्याने शुक्रवारी त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रजनीकांत यांना ब्लड प्रेशरचा त्रास होत होता. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रजनीकांत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असला तरीही त्यांना लगेच शूटिंगला सुरुवात करता येणार नाही. डॉक्टरांनी त्यांना 1 आठवडा बेड रेस्ट घ्यायला सांगितली आहे. तसंच रोजच्या रोज त्यांचं ब्लड प्रेशर तपासलं जाणार आहे. त्यांना जास्त हालचाल करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे.
रजनीकांत 13 डिसेंबरपासून हैदराबादमध्ये अन्नाथे सिनेमाचं शूटिंग करत होते.हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये अन्नाथे सिनेमाचं शूटिंग करत होते. मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. अन्नाथे (Annaatthe shooting) या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. तेलंगणाच्या राज्यपालांनी रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडे विचारपूस केली होती आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. तसंच कमल हसन यांनीही रजनीकांत यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दक्षिण भारतामध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला आता पारावार उरला नाही.