मुंबई, 04 नोव्हेंबर: माझी आई काळुबाई (Majhi Aai Kalubai) या मालिकेतील वाद आता आणखी चिघळला आहे. मालिकेत मुख्य भूमिका करणाऱ्या प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad)ने ही मालिका सोडली आहे. प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. पत्रकार परिषेत काय म्हणली प्राजक्ता? माझी आई काळुबाई या मालिकेला रामराम ठोकल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. प्राजक्ता म्हणाली, “ मला या मालिकेतून काढलं अशी खोटी बातमी पसरवली जात आहे. मी स्वत: या मालिकेमधून बाहेर पडले आहे. मला सेटवर विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली. माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले. तुमच्या मुलींसोबत असं काही घडलं असतं तर अलका ताई अशाच वागल्या असत्या का ?" असा सवालही तिने उपस्थित केला आहे. प्राजक्ता पुढे म्हणाली, “माझ्यामुळे सीरिअलचं शूटिंग कधीही थांबलं नव्हतं. मी इव्हेंटची सुपारी घेते असा आरोप झाला त्यात तथ्य नाही. कोरोनामुळे इव्हेंट बंद आहेत.” असं प्राजक्ताने स्पष्ट केलं. पुढे ती म्हणाली, “मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता.” पुढे प्राजक्ताने एक धक्कादायक आरोप केला आहे. “मला रक्त लागलेली साडी दिली गेली, माझ्या आईने त्याविषयी विचारले तर त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटलं गेलं.” प्राजक्ताने पैशांबद्दलही काही गौप्यस्फोट केले आहेत. मला या मालिकेचं आतापर्यंत एकही दिवसाचं पेमेंट झालेलं नाही, “मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8- 8 / 10-10 तास करतात तेव्हा आमच्या घरात चूल पेटते. असं असताना मला एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केलं जात आहे.” राजकारणात जाणार का असा सवाल विचारल्यानंतर सध्या तसा कोणताही विचार केला नसल्याचं सांगितलं. एकूणच काय माझी आई काळुबाई ही मालिका सध्या वादांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. प्राजक्ताने केलेल्या आरोपांवर आता अलका कुबल आणि मालिकेची टीम काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप(Veena Jagtap)ची एन्ट्री होणार आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ आणि ‘बिग बॉस मराठी’मध्ये वीणा जगताप झळकली होती.