मुंबई, 24 डिसेंबर: ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यामुळे इंग्लंडमधून भारतात येणारी सगळी विमानं रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरलाही (Santosh Juvekar) बसला आहे. सिनेमाच्या शूटिंगसाठी गेलेला संतोष तिथेच अडकला आहे. डेटभेट या सिनेमाच्या शूटिंगसाठी 24 नोव्हेंबर रोजी संतोष लंडनमध्ये गेला होता. फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत संतोषने त्याची व्यथा मांडली आहे. संतोष म्हणाला, ’22 डिसेंबर रोजी भारतात परतण्याचं माझं तिकीट होतं पण 31 तारखेपर्यंत फ्लाईट्स बंद आहेत. सरकारने जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. भारतात कोरोनाचं प्रमाण कमी होत असलं तरी गाफील राहून चालणार नाही संकट अजून टळलेलं नाही. काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो. की हे संकट लवकरात लवकर दूर होऊदे आणि मला सुद्धा माझ्या घरी पोहोचता येऊदे. ऑल द बेस्ट.’
संतोष जुवेकर मराठीतला हरहुन्नरी अभिनेता असून आत्तापर्यंत त्याने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. संतोषचे मोरया, झेंडा, रेगे, एक तारा हे चित्रपट विशेष गाजले आहेत.