मुंबई 13 मार्च: बाहुबली फेम प्रभास (Prabhas) हा सध्याचा आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. प्रभास आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव आदिपुरुष (Adipurush) असं आहे. या बहुप्रतिक्षित बिग बजेट चित्रपटात तो भगवान श्री राम यांच्या भूमिकेत झळकणार आहे. परंतु या चित्रपटात सीतेची भूमिका कोण साकारणार याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिचं नाव घेतलं जात होतं. परंतु अखेर दीपिकानं या चित्रपटातून काढता पाय घेतला. परिणामी आता या रोलसाठी अभिनेत्री क्रिती सेनॉनची (Kriti Sanon) वर्णी लागली आहे. क्रितीनं इन्स्टाग्रामवर प्रभाससोबतचे काही फोटो शेअर करुन याबाबत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. एका नव्या प्रवासाची सुरुवात करतेय. आदिपुरुष हा माझ्यासाठी खुप स्पेशल चित्रपट आहे. एका जादुई जगात प्रवेश करण्यास मी सज्ज आहे. अशा आशयाची कॉमेंट करुन तिनं आपला आनंद व्यक्त केला. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या भूमिकेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आदिपुरुषच्या निमित्तानं क्रिती आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात लक्ष्मण या भूमिकेसाठी सनी सिंहची निवडण करण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा निर्माता ओम राऊत करणार आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल.