नवी दिल्ली, 4 डिसेंबर : शेतकरी आंदोलनाबाबत (Farmer Protest) केलेल्या ट्विटनंतर (Tweet) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) च्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आपल्या ट्विटमुळे तिला सर्वांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. आता हरियाणाच्या खाप पंचायतीने (Khap Panchayat) कंगनाला खुलं आव्हान दिलं आहे. जर हिंमत असेल तर हरियाणाला येऊन दाखवं, असं आव्हान त्यांनी कंगनाला दिलं आहे. अखिल भारतीय सर्वजातीय पुनिया खापचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि खाप नेता जितेंद्र छातर म्हणाले की, कंगनामध्ये हिंमत असेल तर तिने हरियाणात यावं. तिला आपली पात्रता कळेल. खाप नेता जितेंद्र छातर म्हणाले की, संपूर्ण देशातील खाप पंचायत कंगनाच्या वक्तव्यावर कडाडून टीका करीत आहे. आणि तिला आव्हान दिलं जात आहे की, असं वक्तव्य केल्यानंतरही तिच्यात जर हिंमत असेल तर तिने हरियाणा व जवळील राज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये येऊन दाखवावं. पुढे खाप नेते जितेंद्र छतर कंगनाविरोधात म्हणाले की, 100-100 रुपयात म्हातारी आई नाही तर नाचणारी येते. जींद आणि इतर ठिकाणीही कंगना रनौत हिच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असेही खाप नेत्यांनी सांगितले.
ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी कंगना रनौत हिचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे की, कंगनाचे ट्विटरवरील अधिकृत खाते बंद केले जावे. कारण कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहे. ‘बार अँड बेंच’ नावाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देत ट्विट केले गेले.