मुंबई 19 मार्च**:** चांगुलपणाचा बुरखा पांगरुन लोकांना फसवणाऱ्या व स्त्रियांचं शोषण करणाऱ्या प्रवृत्तीचे लोक काही कमी नाहीत. अशाच प्रवृत्तीवर भाष्य करणारी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली ही मर्डर मिस्ट्री आता लवकरच उलगडणार आहे. कारण ‘देवमाणूस’ (Devmanus) येत्या 21 मार्च रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतेय. परंतु या मालिकेचा शेवट कसा होणार? डॉक्टरला पोलीस कसे पकडणार? ही उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. काही फॅनमेड स्टोरीनुसार पोलिसांना डॉक्टरांच्या हालचाली संशयास्पद वाटतात. त्यामुळं ते डिंपलला ताब्यात घेतात. डिंपल पोलिसांनी प्रचंड घाबरते अन् ती डॉक्टरांचं सत्य पोलिसांना सांगते. दुसरीकडे डॉक्टर मात्र मुंबईत पळून जातो. मात्र डिंपलमुळं त्याला पुन्हा एकदा गावात परतावं लागतं. अखेर साध्या वेशात त्याची वाट पाहात असलेले पोलीस त्याला पकडतात. अन् तुरुंगात डांबून त्याची चांगलीच धुलाई करतात. अखेर डॉक्टर केलेले सर्व गुन्हे कबूल करतो.
‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.